`मंगळसूत्र कशासाठी, कोणासाठी.. मी का उत्तर देऊ?` मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल, चढ्या स्वरात काय म्हणतेय ती?
Radhika Deshpande Mangalsutra: सध्या मंगळसूत्र हा चर्चेचा विषय ठरतो. आधी टिकली त्यानंतर आता मंगळसूत्र हा चर्चेच विषय ठरत आहे. यावर आता मराठमोळी अभिनेत्रीने देखील उडी घेतली आहे.
Radhika Deshpande Social Media Post: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लक्ष्य करत संपत्तीच्या पुनर्वितरणाच्या आरोपाचे पुनरुज्जीवन केले. 'काँग्रेस तुमच्या मालमत्तेवर पंजा मारत आहे. ते सत्तेत आले तर लोकांची घरे, गाड्या, सोने, तुमची मंगळसूत्रेही हिसकावून वाटून घेतील. ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे त्यांच्यात तुमची संपत्ती वाटली जाईल आणि चोरांकडे जाईल. तुमच्या कष्टाचे पैसे जावेत काा? तुम्हाला ते मान्य आहे का?, असं वक्तव्य मोदींनी राजस्थानमध्ये केलं होतं. तर दुसरीकडे लग्नानंतर मंगळसूत्र घालाव की नाही यावर अभिनेत्री क्षिती जोगने भाष्य केलं होते त्यावरुन तिला प्रचंड ट्रोल करण्यात आले. मंगळसुत्राच्या या वादात आता मराठमोळी अभिनेत्री राधिका देशपांडे हिनं देखील उडी घेतली असून एक पोस्ट शेअर केली आहे.
मराठी अभिनेत्री राधिका देशपांडे अभिनयासोबतच तिच्या निडर स्वभावासाठी ओळखली जाते. राधिका अनेकदा तिचे मत अगदी स्पष्टपणे मांडताना दिसते. सोशल मीडियाच्या माध्यमातून राधिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर आपला जुना फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना तिने एक सविस्तर पोस्ट लिहिली आहे. नाटक व मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री राधिका देशपांडेने यासंदर्भात पोस्ट शेअर करत मंगळसूत्र, लग्नपद्धती, स्त्रियांचे विचार यावर भाष्य केलं आहे.
राधिका देशपांडेची पोस्ट चर्चेत
"मी माझ्या मंगळसूत्राचं वजन करू देणार नाही. मी मंगळसूत्र घालीन किंवा नाही घालणार. माझं लग्नं नुकतंच झालं असो किंवा नसो, माझा नवरा माझा आहे आणि मी त्याची बायको आहे ह्याची आठवण तुम्हाला करून देण्यासाठी मी मंगळसूत्र घालत नसते. त्यामुळे आत्ताच सांगते मी माझ्या मंगळसूत्राचं वजन करू देणार नाही. फरक पडतो. मुळात मंगळसूत्र कशासाठी, कोणासाठी, केंव्हा, कधी, कशाला ह्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला का देऊ?
धमकी वजा सूचना समजा.
उत्तर द्यायची वेळ नाही पण आज मला प्रश्न नक्कीच पडला आहे. कोण होतात हे स्त्री धनाचा हिशोब, झडती, माहिती घेणारे? हे सगळं घेऊन माझं सोनं वाटून द्यायला तो सत्यनारायणाचा प्रसाद आहे? माझं सोनं हे माझं आहे, ते सौभाग्याचं लेणं आहे. आम्ही स्त्रिया सहज बोलता बोलता त्याला ‘प्रीटी ज्वेलरी‘ असं बोलून जातो. पण बहुतांश भारतीय स्त्रियांकरता सोनं, जे आई-वडिलांनी, सासु-सासऱ्यांनी दिलं आहे, जे तिच्या किंवा नवऱ्याच्या परिश्रमातून विकत घेतलं आहे, अशा सोन्याचं वजन किती बरं असेल? काही गोष्टी आकड्यात मोजता येत नसतात. अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेल्यांना ते नाही कळायचं. आम्ही स्त्रिया मंगळसूत्राला जीवापाड जपतो. काळजी पोटी ते ठराविक ठिकाणी घालत नाही. माझ्या घरात तर मंगळसूत्र ठेवायची एक स्वतंत्र जागा आहे. घर घ्यायची वेळ आली तेंव्हा मी माझं सोन विकलं पण मंगळसूत्र मुठीतून सुटलं नाही. आणि ह्या धनाचा हिशोब आणि वाटप आम्ही होऊ द्यायचा, ह्या डाव्या नेत्यांच्या आणि त्यांच्या पार्टीच्या धोरणांच्या पूर्णत्वा करता! मागे टिकली/बिंदी वरून चर्चा उधळली, इतक्यात मंगळसूत्र चर्चेचा विषय ठरलं तर उद्या लग्न संस्कृती वर काहीतरी घणाघाती बोलतील. तर “मी माझ्या मंगळसूत्राचं वजन करू देणार नाही!” विषय संपला. हा फोटो 2005 सालचा आहे, माझ्या लग्नातला. विधी सुरू होण्या आगोदरचा असल्यामुळे ह्यात मंगळसूत्र नाही पण तेंव्हा पासून हा दागिना सौभाग्याचं लेणं ठरला. फोटो जुना आहे पण जुनं ते सोनंच नाही का? म्हणूनच टिकवून ठेवायचं. "