मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीवर आधारित अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या चित्रपटाबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. अनुपम खेर हे या चित्रपटात मनमोहन सिंग यांची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटातल्या इतर पात्रांबद्दलची माहितीही आता समोर येऊ लागली आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधींची भूमिका कोण करतंय हे खुद्द अनुपम खेर यांनीच ट्विटरवरून जाहीर केलं आहे. अर्जुन माथुर या चित्रपटात राहुल गांधींची आणि अहाना कुमरा प्रियांका गांधींची भूमिका करत आहे. अनुपम खेर यांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये तिघंही त्यांच्या भूमिकेत दिसत आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटामध्ये राम अवतार भारद्वाज अटल बिहारी वाजपेयींची तर दिव्या सेठ शाह मनमोहन सिंग यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहेत. या दोघांचे फोटोही अनुपम खेर यांनीच ट्विटरवरून काही दिवसांपूर्वी शेअर केले होते. या चित्रपटात सोनिया गांधींची भूमिका जर्मन अभिनेत्री सुझेन बेर्नट करत आहेत.




मनमोहन सिंग यांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारू यांच्या पुस्तकावर हा चित्रपट आधारित आहे. विजय रत्नाकर गुट्टे चित्रपटाचे दिग्दर्शक तर हंसल मेहता निर्माते आहेत. अक्षय खन्ना यांनी संजय बारूंची भूमिका साकारली आहे. २१ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खानचा झिरो हा चित्रपटही याचदिवशी प्रदर्शित होईल.