नसिरुद्दीन शाह, जया बच्चन, शबाना आजमी यांना अभिनय शिकवणारे गुरु रोशन तनेजा कालवश
गेल्या अनेक दिवसांपासून ते दिर्घ आजाराशी लढा देत होते.
नवी दिल्ली : अनेक नामवंत कलाकारांना अभिनय शिकवणारे, अभिनयाचे गुरु रोशन तनेजा यांचे निधन झाले आहे. ते ८७ वर्षांचे होते. रोशन तनेजा यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या निधनाचं वृत्त दिलं. ८७ वर्षीय रोशन यांनी हिंदी सिनेसृष्टीतील शबाना आजमी, नसीरुद्दीन शाह, जया बच्चन, अनिल कपूर आणि शत्रूघ्न सिन्हा यांसारख्या दिग्गज कलाकारांना अभिनयाचे धडे दिले होते.
रोशन यांचा मुलगा रोहित तनेता यांनी 'आयएएनएस'ला शुक्रवारी रात्री ९.३० वाजता निधन झाल्याचं सांगितलं. गेल्या अनेक दिवसांपासून ते दिर्घ आजाराशी लढा देत होते. रोशन यांच्या मागे पत्नी मीथिका आणि दोन मुलं रोहित आणि राहुल असा परिवार आहे.
सिनेसृष्टीतील अनेकांनी त्यांच्या निधनाबाबत दुख: व्यक्त केलं आहे. शबाना आजमी यांनी ट्विट करत तनेजा यांच्या निधनाची दुख:द बातमी मिळाल्याचं सांगतिलं. 'एफटीआयआय'मध्ये ते माझे गुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं.
अभिनेता राकेश बेदी यांनी देखील ट्विट केलं आहे. 'रोशन तनेजा यांचं निधन झालं असून माझ्यासाठी अतिशय दुख:द दिवस आहे. माझं करियर घडवल्याबद्दल मी त्यांचा आभारी' असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
रोशन तनेजा १९६० सालापासून अभिनयाचे धडे देत होते. 'एफटीआयआय' पुणे येथून त्यांनी अभिनय शिकवण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी मुंबईत रोशन तनेजा स्कूल ऑफ अॅक्टिंग सुरु केलं.