मुंबई : अभिनेता अजय देवगनची मुख्य भूमिका असलेला 'तान्हाजी द अनसंग वॉरियर' हा चित्रपट आता महाराष्ट्रातही टॅक्स फ्री होणार आहे. चित्रपट करमुक्त करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली होती. उत्तर प्रदेशच्या योगी सरकानं राज्यात 'तान्हाजी' चित्रपट करमुक्त केला त्यानंतर हरियाणा सरकारनंही या चित्रपटाला करमुक्त करण्याचा निर्णय घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अधिकाधीक शिवभक्त आणि मराठीजनांपर्यंत हा चित्रपट पोहोचावा आणि ऐतिहासिक स्मृतींचे जनत व्हावे या हेतूनं चित्रपट टॅक्स फ्री करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत एकमत झालं. त्यानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली. 



अजय देवगनचा हा १००वा सिनेमा आहे. तसेच अजय देवगन आणि काजोल तब्बल १० वर्षांनंतर एकत्र काम करत आहे. अजय देवगनच्या तोडीला तोड असा अभिनेता सैफ अली खानची भूमिका देखील वाखाण्याजोगी आहे.


तान्हाजी चित्रपट भारतात ३ हजार ८८० रूपेरी पडद्यावर प्रदर्शित करण्यात आला असून संपूर्ण जगात ४ हजार ५४० पडद्यांवर चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. ओम राऊत यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 


काजोल, अजय देवगन, शरद केळकर, देवदत्त नागे या आणि अशा अनेक कलाकारांच्या मेहनतीतून 'तान्हाजी' हा चित्रपट साकारण्यात आला आहे. स्वराज्याचा भक्कम पाया रचत त्यासाठी मर्द मावळ्यांना एकत्रित आणणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांची एक साहसगाथा या चित्रपटाच्या माध्यमातून साकारण्यात आली आहे. सत्यघटनेवर आधारलेलं या चित्रपटाचं कथानक आणि त्यातील साहसदृश्य या चित्रपटाच्या जमेची बाजू ठरत आहेत.