Ali Fazal on Mirzapur 3: ओटीटीवर (OTT) काही वेब सीरिज प्रचंड गाजल्या असून, प्रेक्षकांनी नेहमीच त्यांच्या पुढच्या सीझनची प्रतिक्षा असते. 'मिर्झापूर' (Mirzapur 3) ही वेब सीरिजही त्यापैकीच एक आहे. मिर्झापूरच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं होतं. त्यातील पात्र, संवाद सर्व काही प्रेक्षकांना खिळवणारं होतं. पण त्यानंतर आलेले सीझन प्रेक्षकांवर ती छाप सोडू शकलेले नाहीत. नुकताच मिर्झापूरचा तिसरा भाग प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. या वेब सीरिजमध्ये अली फजलने (Ali Fazal) गुड्डूचं पात्र साकारलं असून, अभिनयासाठी त्याचं कौतुक होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या हंगामापासून अली फजल या वेब सीरिजमध्ये असून त्याने पुन्हा एकदा हे पात्र जिवंत केलं आहे. पण वेब सीरिजला प्रेक्षकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसून संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अनेकांनी तर हा हंगाम निराशा कऱणारा असल्याचं स्पष्टपणे म्हटलं आहे. अली फजलने झी न्यूजशी संवाद साधताना यावर आपलं मत मांडलं आहे. 


अली फजलला तिसऱ्या हंगामाला मिळणाऱ्या संमिक्ष प्रतिक्रिया आणि नाराजीबद्दल विचारण्यात आलं असता तो म्हणाला की, "अशा प्रकारच्या मोठ्या शोमध्ये फक्त एकच गोष्ट माझ्या नियंत्रणात आहे ती म्हणजे मी जे पात्र साकारत आहे आणि जी उंची त्यासाठी गाठत आहे. याशिवाय इतर गोष्टींमध्ये पडण्याची माझी इच्छा नाही. म्हणजे अचानक क्रिएटर्ससोबत बसायचं आणि त्यांना अशाप्रकारे स्ट्रीमलाईन करा किंवा नाही असं सागायचं".


यावेळी अली फजलने मिर्झापूरनंतर मोठा फॉरमॅट असणाऱ्या कार्यक्रमांमध्ये काम करण्याची भिती वाटत असल्याचं म्हटलं आहे. "जेव्हा तुम्ही मला इतर प्रोजेक्ट्सबद्दल विचारता, तेव्हा नक्कीच एक वेगळा दृष्टिकोन असतो. पण मिर्झापूर हा एकमेव शो आहे जो मी करू शकलो आहे आणि आता मला अशा मोठ्या प्रोजेक्टचा भाग व्हायला खूप भीती वाटते. कारण मानसिकदृष्ट्या हे फार थकवणारं असतं. त्यामुळे माझी निवड करण्याची प्रक्रिया वेगळी आहे," असं त्याने सांगितलं.


पुढे त्याने सांगितलं की, "हे एक छान जग आहे आणि मला फार मजा आली. मला अभिनेता म्हणून शिकण्याची संधी मिळाली". मिर्झापूरच्या पुढील हंगामाबद्दल विचारण्यात आलं असता अली फजलने आपल्याला खरं तर इतका मोठा ब्रेक आवडतो असं सांगत जास्त भाष्य करण्यास नकार दिला. 


अली फजलने 'थ्री इडियट्स' चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने फक्त बॉलिवूडच नाही तर हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी तो बॉलिवूडमध्ये ओळखला जातो