मराठमोळ्या अभिनेत्याच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का
परदेशातील प्रत्येक नागरीक भारतात येण्यासाठी अत्यंत प्रयत्न करत आहे.
मुंबई : संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावण आहे. अशाच परदेशातून भारतात येणाऱ्या भारतीय नागरिकांची संख्या देखील फार मोठी आहे. त्यामुळे विमानतळावर मोठ्याप्रमाणत सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. परदेशातील प्रत्येक नागरीक भारतात येण्यासाठी अत्यंत प्रयत्न करत आहे. प्रत्येकाला सध्या घराची ओढ लागली आहे. अशात मराठमोळा अभिनेता अमेय वाघने त्याला आलेला अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला.
त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ प्रशासनाचं, विमानतळावर कोरोना टेस्ट घेणारे डॉक्टर, शिकावू डॉक्टर्स, पोलीस आणि सर्व कर्मचाऱ्यांचं अमेयनं कौतुक करत त्यांचे आभार मानले आहेत. अमेय मर फोटो स्टुडीओ नाटकाच्या निमित्तानं तो अमेरिकेला गेला होता.
पण कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोप पाहता त्याच्या नाटकाचे सर्व प्रयोग रद्द करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे तो अमेरिकेत त्याच्या नातेवाईकांच्या घरी थांबला होता. यावेळेस त्यांनी माझी फार छान काळजी घेतल्याचं देखील त्याने सांगितलं. त्याचा हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. काही राज्यांमध्ये गर्दी टाळण्यासाठी नागरिकांवर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादण्यात आले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी स्वयंशिस्तीनेच नागरिकांनी आपलं सहकार्य करावं असं आवाहन प्रशासकीय यंत्रणेकडून करण्यात येत आहे.