मुंबई : जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या हिंसाचाराला बॉलिवूडकरांनी देखील विरोध केला आहे. जेएनयू हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी मुंबईतल्या गेट-ऑफ इंडियाजवळ ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात 'फ्री काश्मीर'चे पोस्टर दिसल्याचंही सांगण्यात येतंय. ५ ऑगस्ट रोजी भारत सरकारनं जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द केला होता. आता या पोस्टरमुळे नाव्या वादाला तोंड फुटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता आंदोलन आणि पोस्टरवर वाद सुरू झाल्यांचं दिसून येत आहे. या वादावर आता अभिनेते अनुपम खेर यांचा राग अनावर झाला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला. 'जेएनयू हिंसाचाराच्या आंदोलनात 'फ्री काश्मीर'चे पोस्टर का? पोस्टर आणि हिंसेचा संबंध काय? कोणी जबाबदार व्यक्ती याचे विरोध करतो का?'



अशा प्रकारचे प्रश्न त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केले आहेत. जर यासाठी कोणी जबाबदार नसेल तर हे विद्यार्थांचे आंदोलन नसून यामागील उद्देश वेगळा असल्याचं ते म्हणाले. विद्यार्थ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे मुंबई, पुण्यासह देशाच्या विविध भागात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.


जेएनयूमध्ये ५ जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी मुंबईतल्या गेट-ऑफ इंडियाजवळ ठिय्या आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी हटवलंय. आंदोलकांना आझाद मैदानात आंदोलन करण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय. गेट वे ऑफ इंडियाजवळील आंदोलनामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम होतोय. 


तसंच पर्यटकांनाही अडचणीचा सामना करावा लागत असल्यामुळे आंदोलकांना आझाद मैदानात जाण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या. मात्र, आंदोलकांनी नकार दिल्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आलं. तसंच त्यांना पोलीस व्हॅनमधून आझाद मैदानात नेण्यात आलं.