वाघालाही फाडतो हा शिवरायांचा `छावा`! छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार `हा` अभिनेता
Shivrayancha Chhava Movie: छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत कोण भूमिका साकारणार यावरुन अनेक सवाल उपस्थित होत होते. अखेर या अभिनेत्याचा चेहरा समोर आला आहे.
Digpal Lanjekar Upcoming Movie Shivrayancha Chhava : शिवराज अष्टक या संकल्पनेद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांची व स्वराज्याची यशोगाधा मांडण्याचा प्रयत्न लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता दिग्पाल लांजेकर यांनी केला आहे. आता दिग्पाल लांजेकरने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येणार आहे. संभाजी महाराजांचे चरित्र आता चित्रपटाच्या माध्यमातून येणार आहे. या चित्रपटात संभाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. पण आता चाहत्यांची ही उत्सुकता संपली आहे. आता अखेर तो चेहरा समोर आला आहे.
छावा चित्रपटाची घोषणा केल्यापासून यात भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता होती. यापूर्वी दिग्पाल लांजेकर यांच्या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका अभिनेता चिन्मय मांडलेकरने साकारली आहे. चिन्मयने या भूमिकेला पुरेपुर न्याय दिला आहे. तर, प्रेक्षकांनीही शिवरायांच्या भुमिकेतील चिन्मयवर मानापासून प्रेम केले. त्यामुळं छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका कोण साकारणार, याबाबत चाहते उत्सुक होते. आता अखेर ही उत्सुकता संपणार आहे.
छावा या चित्रपटाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यात संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा चेहराही दाखवण्यात आला आहे. संभाजी महाराजांची ताकदीचा नमुनाच जणू या प्रोमोतून दाखवण्यात आला आहे. प्रोमोच्या सुरुवातीलाच महाराज वाघाशी लढताना दिसत आहेत. तर, या प्रोमो शेअर करताना खाली कॅप्शनही देण्यात आले आहेत. कोण शत्रू यावरी, करील कैसा कावा, वाघालाही फाडतो हा शिवरायांचा छावा.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत अभिनेता भूषण पाटील हा दिसणार आहे. या पूर्वी घे डबल या चित्रपटात त्याने काम केले होते. छावा चित्रपट हा चित्रपट 16 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. तर अभिनेता चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. तर अभिनेत्री मृणाल कुलकर्णी जिजाऊ आऊसाहेबांच्या भूमिकेत आहेत.
चित्रपटाच्या प्रोमोच्या सुरुवातीलाच घनदाट जंगल दिसत आहे. तर, जंगलाच्या मधोमध वाघासोबत महाराज लढाई करताना दिसत आहेत. या दमदार प्रोमोमुळेच चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, शिवराज अष्टकामधील हा सहावा चित्रपट आहे. याआधी फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज आणि सुभेदार हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या पाचही चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता.