मुंबई : प्रसिद्ध ओरिया अभिनेते रायमोहन परिदा शुक्रवारी यांनी भुवनेश्वरमधील प्राची विहार येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ते 58 वर्षांचे होते. प्राथमिक माहितीनुसार, परिदा यांनी आत्महत्या केली आहे. मात्र, अभिनेत्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच मंचेश्वर पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला.
 
मृतदेह  पोस्टमार्टमसाठी राजधानी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. रायमोहन यांच्या अकाली निधनाच्या बातमीने संपूर्ण ओडिया फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. ही धक्कादायक बातमी मिळाल्यानंतर शेकडो ओडिया अभिनेते, सहकलाकार आणि चाहते त्यांच्या निवासस्थानी जमा झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओडिया चित्रपटाचे दिग्दर्शक चंडी पारिजा यांनी सांगितलं की, "माझा अजूनही विश्वास बसत नाही की, रायमोहन सारखी व्यक्ती आत्महत्या करू शकते तसंच तो आत्महत्या का करेल? त्यांचं स्वतःचे घर आहे, मुलीचं लग्न आहे आणि तो आर्थिकदृष्ट्या मजबूत माणूस होता. असा कोणताही स्रोत सापडू शकत नाही ज्यामुळे त्याला इतके कठोर पाऊल उचलावं लागेल."


रायमोहन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना, प्रसिद्ध अभिनेते सिद्धांत महापात्रा म्हणाले, "जीवनात अनेक चढउतार पाहिलेला अभिनेता असं करु शकतो यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. कारण तो खूप यशस्वी होता."


100 पेक्षा अधिक सिनेमात केलाय अभिनय
रायमोहन परिदा हे मूळचे केओंझार जिल्ह्यातील आहेत. त्यांचा जन्म 10 जुलै 1963 रोजी झाला आणि त्यांनी 100 हून अधिक उडिया आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केलं. सिंघा वाहिनी (1998), सुना भाऊजा (1994) आणि मेंटल (2014) आणि इतर यांसारख्या चित्रपटांमधील अभिनयासाठी त्यांना प्रशंसा मिळाली.



रायमोहन परिदा यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. एका मुलीचं लग्न झालं, तो पत्नी आणि दुसऱ्या मुलीसह प्राची विहार येथील फ्लॅटमध्ये राहत होता. त्यांच्या एका शेजाऱ्याने सांगितलं, "आम्ही काल त्यांना भेटलो आणि तो अगदी नॉर्मल दिसत होता. सर्वांचे आवडते रायमोहन आता राहिले नाहीत यावर आमचा विश्वास बसत नाही." ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.