मुंबई: सध्याच्या घडीला चर्चेचा विषय ठरलेल्या #MeToo या मोहिमेअंतर्गत कलाविश्वात बरीच उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले. ज्यानंतर अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांची नावं समोर आली ज्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा या नावांच्या यादीत दिग्दर्शक सुभाष घई यांचाही समावेश आहे. घई यांच्यावर एका महिलेने काही दिवसांपूर्वी बलात्काराचा आरोप केला होता. ज्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्यावर एका अभिनेत्रीने लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. 


'एएनआय' या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अभिनेत्री केट शर्मा हिने सुभाष घई यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 


'त्यांनी मला 6 ऑगस्टला त्यांच्या घरी बोलावलं. जवळपास पाच-सहाजण त्यावेळी त्यांच्या घरी उपस्थित होते. त्यांनी मला मसाज करण्यास सांगितलं. मी त्यांना मसाज केलं आणि हात धुण्यासाठी म्हणून गेले. तेही माझ्या मागून आले. त्यांनी मला काहीतरी बोलण्यासाठी म्हणून त्यांच्या रुममध्ये बोलावलं आणि मला किस करण्याचा प्रयत्न केला', असं केट म्हणाली. 



केटने केलेले हे आरोप पाहता येत्या काळात घई यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याची चिन्हं आहेत. 


दरम्यान आपल्यावर करण्यात आलेले हे सर्व आरोप आणि त्यानंतर आता करण्यात आलेली पोलीस तक्रार पाहता घई यावर काही प्रतिक्रिया देतात का, याकडेच अनेकांचं लक्ष आहे.