विकास गावकर, झी २४ तास, सिंधुदुर्ग : अण्णा नाईक... रात्रीस खेळ चाले मालिकेतला खलनायक... अण्णांच्या डोळ्यातली जरब कुणाचाही थरकाप उडवणारी... आयाबाया तर अण्णा दिसले की, रस्ताच बदलतात...अण्णा नाईक म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो खलनायकी प्रवृत्तीचा गावगुंड पण टीव्हीच्या पडद्यावर खलनायकी व्यक्तिरेखा साकारणारा अण्णा नाईक वास्तवात हिरो असतो हे नुकतचं संपूर्ण राज्याला पाहायला मिळालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण पडद्यावर अण्णा नाईक साकारणारे अभिनेते माधव अभ्यंकर प्रत्यक्षात किती सज्जन आहेत, याचं उदाहरण २६ जानेवारीला पाहायला मिळालं. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर अभ्यंकरांनी आंबोलीच्या सैनिक स्कूलला १ लाख १ हजार रुपयांची देणगी दिली.


गंमत म्हणजे ही रक्कम अभ्यंकरांनी कशी जमा केली, हा देखील एक किस्साच आहे. रात्रीस खेळ चाले मालिकेनं प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलंय. असेच अनेक रसिक प्रेक्षक मालिकेच्या सेटवर यायचे. अण्णा नाईकांसोबत सेल्फी काढायचा हट्ट धरायचे. त्यावर अण्णांनी एक शक्कल लढवली. त्यांनी 'सैनिकहो तुमच्यासाठी' नावानं एक ड्रॉप बॉक्स तयार केला. 



सेल्फी काढायची तर या ड्रॉप बॉक्समध्ये रक्कम टाका, असं ते सांगायचे. वर्षभरानंतर त्यांनी बॉक्स उघडला तेव्हा त्यात लाखभर रुपये जमले होते. त्यांनी ते आंबोली सैनिक स्कूलला भेट दिले.


माधव अभ्यंकर ऊर्फ अण्णा नाईकांनी एक वेगळा आदर्श घालून दिलाय. अण्णांचा हा आदर्श इतर बड्या स्टार मंडळींनीही अंमलात आणायला हरकत नाही.