मुंबई: ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे नुकतेच निधन झाले. ते 65 वर्षांचे होते. नव्वदच्या दशकात नाट्यवर्तुळात प्रदीप पटवर्धन यांनी आपला वेगळाअसा ठसा उमटवायला सुरूवात केली होती. 'मोरूची मावशी' हे त्यांचं गाजलेलं नाटक होतं. त्यांच्या निधनाने मराठी कलाविश्वात निश्चितच मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेते प्रदीप पटवर्धन यांच्या एकलुत्या एका मुलाने नुकतीच एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्याने कुटुंबियांच्या वतीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रदीप पटवर्धन यांचा मुलगा श्रीतेज पटवर्धन यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. 


श्रीतेज पटवर्धन यांनी लिहिले आहे की, “कळवण्यास अत्यंत दु:ख होत आहे की, दिनांक 9 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7 च्या सुमारास माझे वडील कै. प्रदीप शांताराम पटवर्धन यांचे आमच्या झावबावाडी, गिरगाव येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्यावर त्याच दिवशी दुपारी ३ वाजता चंदनवाडी, गिरगाव येथील स्मशानभूमीत शास्त्रशुद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. हे सर्व विधी त्यांचा एकुलता एक मुलगा या नात्याने मी उपस्थित कुटुंबियांच्या समवेत पार पाडले. 


माझ्या वडिलांचे हे असे अचानक जाणे सगळ्यांसाठी धक्कादायक होते. वयाच्या 65 व्या वर्षी सुद्धा ते अत्यंत सक्रीय होते. त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता. अगदी आदल्या दिवशीसुद्धा ते एका नाट्य स्पर्धेचे परीक्षक होते.


आमच्यावर कोसळलेल्या या दु:खद प्रसंगात, आम्हाला धीर देणाऱ्या, सांत्वन करणाऱ्या, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या उपस्थित राहणाऱ्या सर्वांचेच आम्ही, त्यांचा मुलगा श्रीतेज पटवर्धन, माझी पत्नी निकिता पटवर्धन, माझी आई सुवर्णरेहा जाधव आणि माझे काका सुधीर पटवर्धन ऋणी आहोत.


माझ्या वडिलांचे त्यांच्या कार्यक्षेत्र आणि अभिनय यावर निस्सीम प्रेम होते. त्यांनी कायमच रंगभूमीची मनोभावे सेवा केली. त्यांचे हेच विचार आम्हाला पुढच्या वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरतील, याची मला खात्री आहे. कारण द शो मस्ट गो ऑन”, अशा शब्दांत प्रदीप पटवर्धन यांचा मुलगा श्रीतेज पटवर्धन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


गिरगावातल्या झावबा वाडी येथे प्रदीप पटवर्धन यांचं निवासस्थान होतं. त्यांनी त्यांच्या अभिनयाची सुरूवात एकांकिकांपासून केली होती. 'मोरूची मावशी' हे त्यांचं नाटक प्रचंड गाजलं होतं. अभिनेते प्रशांत दामले, जयवंत वाडकर, विजय पाटकर तसेच त्याकाळी मराठी सिनेसृष्टी गाजवणारे दिग्गज अभिनेते सचिन पिळगावकर, अशोक सराफ यांच्यासह त्यांनी अनेक मराठी चित्रपटांतून प्रभावी भुमिका निभावल्या होत्या. 


अभिनेते, निर्माते सचिन पिळगावकर यांच्या 'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटात त्यांनी साकारलेली भुमिका लक्षवेधी होती. 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय' या चित्रपटातूनही त्यांनी काम केलं होतं. अलीकडेच 'सुखांच्या क्षणांनी हे मन बावरे' आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकांतूनही त्यांनी भुमिका साकारल्या होत्या ज्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. 



9 ऑगस्ट रोजी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर त्याच दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले होते.