`ठिकाणांना कलाकारांची नावं का नाहीत?`
अभिनेते ऋषी कपूर यांचा भारत सरकारला संतप्त सवाल.
मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर सध्या भारत सरकारवर नाराज आहेत. भारत सरकारकडून कलाविश्वातील कलाकारांना योग्य वागणूक मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. परदेशात ज्याप्रकारे कलाकारांना वागणूक दिली जाते, त्यांच्या कामाला न्याय मिळतो तशी वगणूक आणि न्याय भारतीय कलाकारांना त्यांच्या मायदेशी मिळत नाही. असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
'मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला फार वाटतं ते म्हणजे भारतीय कलाकारांचं भारत सरकार कालाकारांना योग्य वागणूक देत नाही. आपला देश चित्रपट, संगीत आणि संस्कृतीमध्ये अग्रेसर आहे. पण ती संस्कृती जे कलाकार जगा समोर मांडतात त्यांना भारतात न्याय मिळत नाही.'
राजकारणी मंडळी आणि कलाकारांमध्ये भारत सरकार तुलना करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 'रस्ते, विमानतळ, पूल इत्यादींना फक्त राजकीय मंडळींची नावे देण्यात येतात.' दुसऱ्या देशांमध्ये ज्याप्रमाणे कलाकारांना वागणूक मिळते तशी वागणूक भारतीय कलाकारांना मिळते का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
तब्बल ५ दशक बॉलिवूडमध्ये काम केलेले ऋषी म्हणतात 'आपल्याकडे पंडित रवी शंकर, लता मंगेशकर यांसारखे मंडळी त्याचबरोबर मनोरंजनाच्या व्यवसायात राज कपूर आणि पृथ्वीराज कपूर यांचं योगदान फार उल्लेखणीय आहे त्यांच्यावर दुर्लक्ष कसं करू शकता? त्यांच्या कामाची वाहवा संपूर्ण जगात होते फक्त माझ्याच देशाच नाही.'
'मेरा नाम जोकर' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या ऋषी यांना अनेक पुरस्कांनी गौरविण्यात आले आहे. ते लवकरच 'द बॉडी' चित्रपटामध्ये भूमिका साकारणार आहेत. 'द बॉडी' १३ डिसेंबर रोजी रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. चित्रपटात अभिनेता इम्रान हश्मी आणि अभिनेत्री वेदीका मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.