Himachal Pradesh Floods : गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसामुळं हिमाचल प्रदेशाचं चित्रच बदललं. निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी ज्या हिमाचलमध्ये पर्यटकांची गर्दी होते त्याच राज्यात सध्या सर्वत्र चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. मागील काही दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळं राज्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आणि त्यांची पात्र आणखी विस्तीर्ण झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतिप्रचंड वेगानं नद्या दुतर्फा असणारी घरं, वृक्ष सारंकाही गिळत पुढे आल्या आणि पाहता पाहता हिमाचल, त्यातही मनाली, मंडी परिसर उध्वस्त झाला. खरंतर इथं हे पर्यटनाचे दिवस पण सध्याची परिस्थिती पाहता हिमाचलमध्ये तूर्तास न येण्याचं आवाहन यंत्रणाही पर्यटकांना करताना दिसत आहेत. 


अभिनेता हिमाचलमध्ये अडकला आणि... 


तिथं हिमाचलमध्ये अनेक पर्यटक आणि स्थानिकांनी निसर्गाचा हा रुद्रावतार पाहिला आणि यामध्ये एका ओळखीच्या चेहऱ्यानं अनेकांच्या नजरा वळवल्या. हा चेहरा होता अभिनेता रुसलान मुमताज याचा. 


रुसलानची इन्स्टाग्राम पोस्ट पाहता तो जिथं अडकला होता तेथील परिस्थिती आणि एकंदर हिमाचलमधील हाहाकाराचा अंदाज आला. 'मी विचारही केला नव्हता की मी मनालीमधील या पूरात अडकेन. इथं नेटव्हर्क नाहीये, घरी जाण्यासाठी परतीची वाट नाहीये, रस्ते वाहतूक बंद आहे, मला चित्रीकरणही करता येत नाहीये', असं त्यांनं सांगितलं. 


हेसुद्धा वाचा : Mumbai Rains : मुसळधार पावसामुळं मुंबईतील सखल भाग जलमय; वाहतुकीचे 'हे' मार्ग बंद 


प्रसंग आव्हानाचा असला तरीही आपण एका सुंदर ठिकाणी अडकलो आहोत हे मात्र तो एका वृत्तसंस्थेला सांण्याचं विसरला नाही. या सुंदर राज्याच्या नुकसानाबाबत त्यानं चिंताही व्यक्त केली. हाच रुसलान हिमाचलमधील या आव्हानात्मक दिवसांनंतर आता मुंबईत परतला आहे. इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून त्यानं आपण शहरात आल्याची माहिती चाहत्यांना दिली. 




हिमाचलमध्ये रुसलानला सापडला खरा HERO 


तिथं पूरग्रस्त हिमाचलमध्ये अडकलेला असतानाच रुसलानला एक अशी व्यक्ती भेटली जो प्रत्यक्ष आयुष्यात उल्लेखनीय काम करून सर्वांची मनं जिंकून गेला. त्या व्यक्तीचं नाव नकुल महंत. नकुलसोबतचा एक फोटो शेअर करत त्याच्या हॉटेलचं बरंच नुकसान झालेलं असतानाही त्यानं रुसलान आणि त्याच्यासोबत असणाऱ्या कलाकार मंडळींसह हॉटेलमधील पाहुण्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिलं आणि मदतीसाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. त्याचे हे प्रयत्न आणि वृत्ती रुसलानचंही मन जिंकून गेली. ज्यानंतर या टेलिव्हीजनवरील हिरोनं प्रत्यक्ष आयुष्यातील HERO ची भेट सर्वांनाच घडवून दिली.