मुंबई : 'स्टाइल' चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारा अभिनेता साहिल खानने दोन महिलांसहित तीन जणांवर एफआयआर दाखल केला आहे. साहिलने तिघांविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली आहे. साहिलच्या इन्स्टाग्रामवरुन काही फोटो एडिट करुन त्यावर अश्लिल कॅप्शनही लिहिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मुंबई मिरर'ने दिलेल्या वृत्तानुसार, साहिलने जाबिर अहमद, करणधीर आणि जे. के पीटर या तिघांनी साहिलचा फोटो एडिट करुन त्याला अश्लिल कॅप्शन देत तो फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. २३ मे ते ६ जूनदरम्यान हे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. 


साहिलने फोटोसोबत छेडछाड करणाऱ्यांबाबत आधी दुर्लक्ष केल्याचं म्हटलंय. 'सुरुवातीला हा प्रकार एक-दोन दिवसांत बंद होईल असं वाटत होतं. परंतु असं न होता फोटोवर अश्लिल कमेंट, शिवीगाळ करणं अधिकच वाढलं. त्यानंतर मी पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतल्याचं' साहिलने सांगतिलं. 



सायबर लॉ एक्सपर्ट आणि साहिलच्या वकीलांनी सांगितलं की, त्या तिघांनी साहिलला बदनाम करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला. त्यामुळे पोलिसांकडून कलम ५०० (मानहानी) आणि कलम ३४ (कॉमन इंटेंशन) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


साहिल खानने 'स्टाइल' चित्रपटानंतर 'अलादीन' आणि 'रामा: द सेवियर' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. साहिल रिअॅलिटी शो बिग बॉसमध्ये देखील सहभागी झाला होता. २०१३ मध्ये साहिलने चित्रपटांना रामराम करत आता तो एक व्यावसायिक आहे. साहिलची गोवामध्ये एका जीमचा मालक असल्याचंही बोललं जातं.