मुंबईः चित्रपटातल्या भुमिकेसाठी सर्वच कलाकार हे मेहनत घेत असतात. त्यात कुठली ऐतिहासिक भुमिका असेल तर त्यावर कलाकरांना विशेष मेहनत घ्यावी लागते. काही भुमिकांसाठी तर भाषा, प्रांत, वेशभुषा सगळ्यांच पातळीवर मेहनत असते. अशा आव्हानात्मक भुमिका स्विकारून ती प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यात अनेक कलाकार यशस्वी ठरले आहेत. परंतु अशा भुमिका करण्यासाठी कलाकारांना घ्यावी लागणारी मेहनत पुष्कळदा प्रेक्षकांसमोरही येत नाही. असाच एक किस्सा अभिनेते समीर धर्माधिकारी यांनी सांगितला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सवराज्यासाठी लढता लढता खस्त होऊ.. तवा रणांगणातली हाडं सावरताना ज्या हाडातून शिवाजी शिवाजी, स्वराज्य स्वराज्य असा आवाज येईल तो जेध्यांची समजा...!!!" एका हातात निखारा आणि दुसऱ्या हातात तुळशीपत्र ठेवलेली जी माणसे शिवाजी महाराजांच्या भोवती होती त्यात प्रामुख्याने आणि अगदीच सुरुवातीपासून जे नाव होते त्यांपैकी एक सरदार कान्होजी राजे जेधे.


रविवार 14 ऑगस्टला दुपारी 12. वाजता 'शेर शिवराज' सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर झी टॉकीजवर होणार आहे.  'शिवराज अष्टक' या मालिकेतील दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांचा 'शेर शिवराज- स्वारी अफझलखान'  हा चौथा सिनेमा. 


अभिनेता समीर धर्माधिकारी यांनी या चित्रपटामध्ये श्रीमंत कान्होजी राजे जेधे या शिवरायांच्या महत्वाच्या मावळ्याची भूमिका केली आहे. मात्र कदाचित श्रीमंत कान्होजी राजे जेधे यांच्या भूमिकेत अभिनेते समीर धर्माधिकारी यांना आपण पाहूच शकलो नसतो. तसेच कदाचित ही अजरामर भूमिका अभिनेता समीर धर्माधिकारी यांच्या हातातून निसटली ही असती, त्याच एकमेव कारण म्हणजे श्रीमंत कान्होजी राजे जेधे बोलत असलेली भाषा.


शिवचरित्रात लपलेले खरेखुरे ‘हिरोज’ पुढं आणण्याचा ध्यास दिगपाल यांनी  घेतला आणि ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ ह्या सारखे कमालीचे चित्रपट घडले. अर्थात कोणताही चित्रपट बनवताना त्यातील प्रत्येक भूमिका ही तितक्याच ताकदीने उभी करणं हे जेवढे कलाकारांचं कौशल्य तेवढीच दिग्दर्शकाची मेहनतही असतेच. त्यामुळेच समीर धर्माधिकारी म्हणतात की जर दिगपाल नसता तर मी " शेर शिवराज " कधी करूच शकलो नसतो. त्याला कारणही तसेच आहे.


समीर धर्माधिकारी हे दिग्पाल लांजेकरांच्या शिवरायांवरील प्रत्येक सिनेमामध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत आहेत. मात्र शेर शिवराज मधील भूमिका ही जास्त आव्हानात्मक होती.


"फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड' या चित्रपटांमध्ये अनुक्रमे मी बेशक खान , नामदार खान आणि सिद्धी जोहर ह्या मुघल सरदारांच्या भूमिका साकारल्या. मराठी किंवा हिंदी भाषा बोलून अभिनय करणे हे माझ्या सारख्या कलाकाराला तितकेसे कठीण नक्कीच नव्हते.  मात्र  शेर शिवराज मधील "  श्रीमंत कान्होजी राजे जेधे " या पात्राची भूमिका साकारताना त्यांची मावळ भाषा बोलून ती भूमिका तितक्याच ताकदीने साकारणे आणि आधी केलेल्या भूमिकांना छेद देणे अशी दुहेरी जबाबदारी माझ्यावर आणि माझ्या दिग्दर्शकावर होती.  खरंच ते खूप आवाहनात्मक होते. शिवकालीन चित्रपटात भाषेला अनन्यसाधारण महत्व होते व शिवरायांचा सरदार भाषा चुकूच शकत नाही.त्यामुळे खरं तर मी खूप साशंक होतो", असं समीर धर्माधिकारी यांनी सांगितलं.


"दिगपालमुळे ही भाषा प्रथम मी आत्मसात केली. थोडा आत्मविश्वास वाढवला. त्यानंतरच या भूमिकेला होकार दर्शवला. अर्थात शेर शिवराजला आणि माझ्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. हा चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक दिवस झाले. तरीही  या चित्रपटाची क्रेझ अजूनही प्रेक्षकांमध्ये दिसून येते यातच सगळं आलं. अर्थात आता सिनेमागृहात धुमाकूळ घालणारा हा सिनेमा प्रेक्षकांना 14 ऑगस्टला घरबसल्या झी टॉकीज वर पाहायला मिळणार आहे तो चुकवू नका"