मुंबई : बॉलिवूडमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता सोनू सूद खऱ्या आयुष्यात मात्र लाखो लोकांसाठी नायक आहे.  कोरोना महामारीच्या काळात सोनू सूदने लाखो लोकांना मदतीसाठी हात पुढे केला. स्थलांतरितांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचवण्यापासून ते बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यापर्यंत त्याने मदत केली. आणि म्हणूनच सोनू सूदचा मोठा चाहतावर्ग आहे.  सोनू सूदची ही लोकप्रियता पाहून एक प्रश्न त्याला नेहमी विचारला जातो, तो म्हणजे राजकारणात कधी एन्ट्री करणार? आतापर्यंत या प्रश्नावर सोनू सूदचं उत्तर नाही असंच होतं. पण यावेळी मात्र त्याचं उत्तर काहीसं वेगळं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजकारणाविरोधात कधीच नाही


एका मुलाखतीत दिलेल्या उत्तरामुळे भविष्यात सोनू सूदची राजकारणात एन्ट्री नक्कीच होईल असं आता त्याच्या चाहत्यांना वाटू लागलं आहे. आपण राजकीय नेत्यांच्या किंवा राजकारणाच्या विरोधात नाही. पण  लोकांनी त्याला वेगवेगळे रंग दिले याचं वाईट वाटतं. सध्यातरी  एक अभिनेता म्हणून मला बरच काम करायचंय. त्यामुळे मी राजकारणात येण्यासाठी सध्या तयार नाही असं सोनू सूदने स्पष्ट केलं आहे.


छतावर चढून घोषणा करेन


सोनू सूदने आपल्या मुलाखतीत सांगितलं की, स्वत:चा मार्ग स्वत:च तयार करतो. राजकीय नेता बनण्यासाठी बरीच तयारी करावी लागते. आणि जेव्हा मला वाटेल की राजकारणासाठी पूर्ण तयार आहे, त्यावेळी मी स्वत: छतावर चढून राजकारणात येण्याची घोषणा करेन, असं सोनू सूदने स्पष्ट केलं.


सोनू सूदचा मोठा चाहता वर्ग


बॉलिवूडमधील अनेक अभिनेते राजकारणात येऊन नेते झाले आहेत, आणि अनेक जण राजकीय कारकिर्दीत यशस्वीही झाले आहेत. आता सोनू सूद राजकारणात एन्ट्री करणार की नाही हे लवकरच कळेल, पण सध्यातरी आपल्या अभिनयावर आणि लोकांच्या मदतीसाठी सोनू सूदचे प्रयत्न सुरु आहेत.