सुशांत राजपूतमुळे नाकारला भन्साळींचा `हा` चित्रपट, अंकिता लोखंडे म्हणाली `मला या निर्णयाचा पश्चात्ताप...`
अर्चना-मानवच्या या जोडीला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. पण आता अंकिताने अभिनेता सुशांत सिंह राजपूतबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे.
Ankita Lokhande On Sushant Singh Rajput : छोट्या पडद्यावरील सर्वाधिक गाजलेल्या मालिकांपैकी एक मालिका म्हणून 'पवित्रा रिश्ता'ला ओळखले जाते. या मालिकेने 2009 पासून 2014 पर्यंत प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. पवित्र रिश्ता या मालिकेमुळेच अभिनेत्री अंकिता लोखंडे घराघरात पोहोचली. मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तिने चाहत्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले. या मालिकेत अंकिताने अर्चना हे पात्र साकारले होते. तर दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मानव हे पात्र साकारले होते. अर्चना-मानवच्या या जोडीला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. पण आता अंकिताने अभिनेता सुशांत सिंह राजपूतबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे.
अंकिता लोखंडे ही सध्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक पाहायला मिळत आहेत. त्यासोबत काही महिन्यांपूर्वी अंकिता ही बिग बॉसच्या 17 पर्वातही झळकली होती. आता अंकिताने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने अनेक सुपरहिट चित्रपट नाकारण्यामागचे कारण सांगितले. यावेळी तिने मी सुशांत सिंह राजपूतमुळे या चित्रपटांना नकार दिला, असे सांगितले.
अनेक मोठ्या चित्रपटांना दिला नकार
"मला संजय लीला भन्साळी यांनी बाजीराव मस्तानी या चित्रपटासाठी विचारले होते. पण तेव्हा मी सुशांत सिंह राजपूतसोबत सिरियस रिलेशनमध्ये होते. त्यावेळी मी त्याच्यासोबत लग्नाची स्वप्न पाहत होते. त्यामुळे तेव्हा मी करिअरपेक्षा वैयक्तिक आयुष्य आणि नात्याला जास्त महत्त्व देत होते. त्याचमुळे मी अनेक मोठ्या चित्रपटांना नकार दिला होता", असे अंकिता लोखंडे म्हणाली.
"मला लग्न करायचे असल्याने मी हा चित्रपट करु शकणार नाही, असे अंकिताने संजय लीला भन्साळींना सांगितले होते. त्यावेळी संजय लीला भन्साळींनी मला तुला बाजीराव मस्तानी हा चित्रपट नाकारल्याचा पश्चात्ताप नक्की होईल, असे म्हटले होते. यानंतर आता जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा मी माझ्या आयुष्यात अनेक चुकीचे निर्णय घेतलेत असं मला वाटतं. पण मी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाचा पश्चात्ताप मला होत नाही. या मोठ्या चित्रपटांसाठी ऑडिशन देण्याची संधी मिळाली, याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजते. मला अजूनही आशा आहे की मला भविष्यात संजय लीला भन्साळींसोबत काम करण्याची संधी नक्कीच मिळेल", असेही अंकिता लोखंडने म्हटले.
अंकिता आणि सुशांत 7 वर्षे रिलेशनमध्ये
दरम्यान अंकिता लोखंडे आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत 'पवित्र रिश्ता' मालिकेमध्ये एकत्र झळकले होते. ते दोघेही सात वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. पण 2016 मध्ये त्या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.