Hina Khan Rajan Shahi fight : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेला ओळखले जाते. काही महिन्यांपूर्वी या मालिकेतून अरमान आणि रुहीची भूमिका साकारणाऱ्या शहजादा धामी व प्रतीक्षा होनमुखे यांना निर्मात्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यामुळे सध्या हा कार्यक्रम चर्चेत आहे. आता या कार्यक्रमाचे दिग्दर्शक-निर्माते राजन शाही यांनी शहजादा धामी व प्रतीक्षा होनमुखे यांना मालिकेतून काढण्याबद्दल भाष्य केले. यावेळी त्यांनी अभिनेत्री हिना खानला मालिकेतून बाहेर काढण्यामागचे कारण सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजन शाही यांनी नुकतंच 'टेली टॉक इंडिया' या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अरमान आणि रुहीची भूमिका साकारणाऱ्या शहजादा धामी व प्रतीक्षा होनमुखे यांना निर्मात्यांनी का काढले, याबद्दल सांगितले. प्रतीक्षा होनमुखे ही प्रॉडक्शन युनिटसमोर नखरे करायची आणि एकदा दिग्दर्शकाने तिला एक सीन कसा करायचा हे सांगत होता, पण त्यावेळी ती निघून गेली, असे राजन शाही यांनी म्हटले. त्यावेळी त्यांनी हिना खानलाही मालिकेतून काढण्यामागील खरं कारण सांगितले. 


तिला मालिकेतून काढून टाकण्यात आले


हिना खानला वेळेची समस्या होती. त्यासोबतच ती वारंवार पटकथेतही ढवळाढवळ करत होती. मालिकेच्या सेटवर अनेक घटना घडल्या, ज्यामुळे सेटवर राग, रुसवे आणि कटुता निर्माण झाली. ज्यामुळे मी आणि चॅनलने एकत्र मिळून तिच्यासोबत एक बैठक घेतली आणि त्यानंतर तिला मालिकेतून काढून टाकण्यात आले. पण यानंतरही चुकीच्या गोष्टी या घडतच होत्या, असे राजन शाही यांनी म्हटले. 


यानंतर राजन शाही यांनी एका घटनेबद्दलही सांगितले. यावेळी ते म्हणाले, एक दिवस शूटींग सुरु होते आणि हिनाला काही ओळी बोलायच्या नव्हत्या. त्यावेळी हिनाने स्क्रिप्टमध्ये हस्तक्षेप करत त्या ओळी बोलण्यास नकार दिला. मी त्यावेळी तिला हा सीन जसा आहे तसा करावाच लागेल, असे सांगितले. पण तिला ते मान्य नव्हते. यावेळी मी तिला एकतर तू शूटींग कर नाहीतर मालिका सोडून निघून जा, असे सांगितले. 


तुझा यापुढे कार्यक्रमाशी कोणताही संबंध नाही


यानंतर ती दिवसभर मेकअप रुममध्ये बसली होती. यानंतर रात्री जेव्हा ती सेटवरुन निघाली तेव्हा तिला यापुढे तू सेटवर नाही आलीस तरी चालेल, असे सांगण्यात आले. त्यानतंरही ती दुसऱ्या दिवशी आली आणि तिने तो सीन लिहिल्याप्रमाणे शूट केला. पण मला तिच्या वागण्याचा प्रचंड राग आला होता. त्यामुळे पॅक अपच्या वेळी तिला तुझा यापुढे या कार्यक्रमाशी कोणताही संबंध असणार नाही, असे सांगण्यात आले. 


मालिकेचा टीआरपीही चांगला


हिनाने त्या दिवशी शिवांगीसोबत शूट केलेले ते सहा सीन मी काढून टाकले होते. ती बाहेर पडल्यानंतर पुन्हा टीमला काम सुरु करण्यासाठी तीन दिवस लागले. पण आता सर्व काही सुरळीत आहे. या मालिकेचा टीआरपीही चांगला आहे, असे राजन शाही यांनी सांगितले. दरम्यान 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेच्या सुरुवातीला मुख्य अभिनेत्री म्हणून हिना खान झळकली होती. याच मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. तिने या मालिकेसोबत तब्बल 6 वर्षे काम केले. पण त्यानंतर तिने या मालिकेतून एक्झिट घेतली.