बॉलिवूडमध्ये मानधनाबाबत अभिनेत्रींसोबत भेदभाव होतो- काजोल
काजोल `देवी` या लघुपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला आहे.
मुंबई : अभिनेत्री काजोल आणि अभिनेता अजय देवगन स्टारर 'तान्हाजी' चित्रपटाच्या भरघोस यशानंतर कजोलने आपला मोर्चा लघुपटाकडे वळवला आहे. काजोल 'देवी' या लघुपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला आहे. सध्या ती लघुपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच देवीचं स्क्रिनिंग मुंबईत पार पडलं. यावेळी लघुपटातील अन्य कलाकार देखील उपस्थित होते.
दरम्यान, काजोलला बॉलिवूडमध्ये स्त्री-पुरुष समानता आहे का असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना ती म्हणाली, 'भेदभाव हा फक्त बॉलिवूडमध्ये नाही तर प्रत्येक क्षेत्रात आहे. त्यामुळे समाजाने सर्वात आधी बदलण्याची गरज आहे. एखाद्या महान स्त्रीच्या यशोगाथेवर चित्रपट साकारला जातो तेव्हा त्या चित्रपटाला प्रेक्षकांना पसंती दर्शवली तर मानधनाबाबत भेदभाव राहणार नाही.' अशाप्रकारे तिने समाजात बदल घडवण्यासाठी आवाहन केले.
त्याचप्रमाणे होणारा भेदभाव ही फक्त बॉलिवूड किंवा कोणत्या दुसऱ्या क्षेत्राची अडचण आहे आसं बोलूण चालणार नाही तर ही आपली अडचण आहे आणि आपणच या विषयी आवाज उठवू शकतो असं वक्तव्य देखील तिने यावेळेस केलं.
'देवी' हा लघुपट ९ महिलांच्या आयुष्याभोवती फिरताना दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आहे. ९ वेगळ्या वयाच्या विचारांच्या आणि धर्माच्या महिला एका छताखाली राहतात तेव्हा कोण-कोणत्या समस्या समोर येतात हे या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांना अनुभवता येणार आहे.
काजोलचा हा पहिलाच लघुपट आहे. या पटकथे मध्ये काजोल शिवाय अभिनेत्री श्रृती हसन, नीना गुप्ता आणि मराठमोळी अभिनेत्री मुक्ता बर्वे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.