तब्बल २४ वर्षांनंतर काजोलकडून `त्याच` गोष्टीची पुनरावृत्ती
कित्येक वर्षांनंतर ....
मुंबई : बॉलिवूडच्या संपूर्ण वर्तुळात आजवर कित्येक चित्रपटांची अफलातून जादू पाहायला मिळाली आहे. प्रदर्शनाच्या कित्येक वर्षांनंतर या चित्रपटांच्या लोकप्रियतेत तसूभरही कमतरता झालेली नाही. 'जा सिमरन जा... जी ले अपनी जिंदगी...' असं म्हटल्यावरही या लोकप्रिय चित्रपटांपैकीच एक नाव आठवतं. ते नाव म्हणजे 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'.
'क्लासिक लव्हस्टोरी' म्हणून गणल्या जाणाऱ्या आदित्य चोप्रांच्या या चित्रपटातून शाहरुख आणि काजोलच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीचं एक सुरेख उदाहरण प्रेक्षकांना पाहता आलं होतं. अशा या सुपरहिट चित्रपटाला आजच्याच दिवशी म्हणजे १९ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रदर्शित होऊन तब्बल २४ वर्षे पूर्ण झाली आहेत.
'डीडीएलजे'मधील अनेक दृश्य, नव्हेच तर सारा चित्रपटच काही प्रेक्षकांच्या मनात असा काही घर करुन आहे की कित्येकांनी तर तो पाहण्याचा अलिखित विक्रमही केला आहे. खास चित्रपटाच्या खास दिवसानिमित्त अभिनेत्री काजोल हिने एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने 'डीडीएलजे'तील एका दृश्याची पुनरावृत्ती केली आहे.
मोठ्या फ्रेमचा चष्मा, हातात पुस्तक असा तोच लूक पुन्हा पाहायला मिळत आहे. 'आताही तसा चष्मा वापरते, आताही अशा कोणत्यातरी जागी जाऊन वाचत बसते. चोवीस वर्षांनंतरही..... ', असं कॅप्शन तिने या फोटोवर दिलं आहे. तिने पोस्ट केलेला हा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनीही या चित्रपटाप्रती असणारं प्रेम व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.