VIDEO : तनिषा मुखर्जी परदेशात वर्णद्वेषाची शिकार
न्यूयॉर्कमधील एका हॉटेलमध्ये तिला या प्रसंगाला सामोरं जावं लागलं.
न्यूयॉर्क: 'बिग बॉस'च्या सातव्या पर्वात प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री काजोलची बहीण तनिषा मुखर्जी हिला परदेशात वर्णभेदाचा सामना करावा लागला आहे. न्यूयॉर्कमधील एका हॉटेलमध्ये तिला या प्रसंगाला सामोरं जावं लागलं. Jane Hotel NYC असं त्या हॉटेलचं नाव असून, तनिषाने सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट करत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केल्याचं म्हटलं आहे.
१० मार्चला घडलेल्या या प्रसंगाविषयी ट्विट करत तिने ती जागा, हॉटेल अत्यंत वाईट असून तिथे असणारे लोकही तितकेच वाईट असल्याची प्रतिक्रिया दिली. CRY America charity gala या कार्यक्रमासाठी ती परदेशात गेली असून, 'द जेन हॉटेल' येथेच वास्तव्यास होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तनिषा तिच्या मित्रमंडळींसोबत त्या हॉटेलमध्ये पार्टी करत होती, क्लबमध्ये त्यांची धमाल सुरू होती. त्याचवेळी हॉटेलमधील एका कर्मचाऱ्याक़डून तिच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली. या सर्व परिस्थितीची माहिती तनिषाने हॉटेलच्या व्यवस्थापकांना देण्याचा प्रयत्न केला. पण, यातही ती अपयशी ठरली. तिने केलेल्या ट्विटवर काही प्रत्यक्षदर्शींकडून करण्यात आलेल्या कमेंट पाहता या प्रसंगाला गंभीर वळण मिळाल्याचं स्पष्ट होत होतं. मुख्य म्हणजे त्या हॉटेलमध्ये तनिषा आणि तिच्या मित्रमंडळींवर, 'जिथून आलात तिथे परत जा', वगैरे.... अशा आशयाची टिप्पणी करण्यात आल्याची बाब समोर आली आहे.
'मिड- डे'शी झाल्या प्रसंगाविषयी बोलताना आपण अशा प्रकारच्या प्रसंगाचा पहिल्यांदाच सामना केल्याची प्रतिक्रिया तिने दिली. किंबहुना अमेरिकेत पहिल्यांदाच अवहेलनापूर्ण प्रसंगाला सामोरं गेल्याचा धक्का बसल्याचंही ती म्हणाली. बॉलिवूड सेलिब्रिटींना वर्णद्वेषाचा सामना करावा लागल्याची ही पहिलीच वेळ नाही. अमेरिकेत यापूर्वी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि इतरही काही बी- टाऊन कलाकारांना अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला होता.