मुंबई : ‘लेखकानं स्वतः पाहिलेलं, अनुभवलेलं किंवा कल्पिलेलं असतं; ते जवळजवळ तसंच उभं करण्याची लेखकाची ताकद किती असू शकते हे ‘रारंगढांग’ या प्रभाकर पेंढारकरांच्या पुस्तकातून मला कळलं.’ असं म्हणणारी आणि सुरुवातीला वाचनाचीही फारशी आवड नसलेली मधुरा वेलणकर ही अभिनेत्री 'झी दिशा'चे विजय कुवळेकर यांच्या आग्रहाखातर स्वतःचे अनुभव ‘मधुरव’ या सदरातून मांडायला लागली आणि ती या लेखनप्रपंचात इतकी रमून गेली की, या सदरातल्या आणि इतर नियतकालिकांतल्या लेखांचं पुस्तकात रूपांतर होण्याच्या दिशेनंचा तिचा प्रवास तिच्याही नकळत तिला सीमोल्लंघनाच्या वळणापर्यंत घेऊन आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चार राज्य पुरस्कारांची आणि इतर अनेक पुरस्कारांची मानकरी ठरलेली एक चतुरस्र अभिनेत्री म्हणून आपल्याला परिचित असलेल्या आणि नाट्य-चित्रपट-अभिनय शिबिरं-कार्यशाळा अशा नानाविध माध्यमांतून गेल्या दोन दशकांहून अधिक काळ अभिनयाच्या क्षेत्रात घोडदौड करणाऱ्या मधुरानं अगदी सहजच लेखनक्षेत्रातही पाऊल टाकलं आणि आता तिच्या पहिल्यावहिल्या पुस्तकाचं ‘मधुरवचं’ प्रकाशन तिच्या वाढदिवशीच मंगळवारी 8 ऑक्टोबरला विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर प्रसिद्ध नाटककार आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या शुभहस्ते यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा वेस्ट इथं रात्री ८ वाजता होणार आहे.



‘रसिक आन्तरभारती’ या पुण्याच्या नामवंत प्रकाशनाकडून प्रकाशित केल्या जाणाऱ्या या पुस्तकाच्या प्रकाशनसोहळ्याची सगळी सूत्रं लोकप्रिय अभिनेते पुष्कर श्रोत्री यांच्या हातांत असून अनेक कलाकार या सोहळ्याचे साक्षीदार असणार आहेत. ‘चला हवा येऊ द्या’फेम श्रेया बुगडे आणि ‘माझ्या नवर्‍याची बायको’फेम अनीता दाते या दोन अभिनेत्री ‘मधुरव’ पुस्तकातल्या निवडक अंशांचं अभिवाचन या प्रसंगी करणार आहेत. 


तसंच मधुरा वेलणकर-साटम यांचे कुटुंबीय आणि चित्रपट-नाट्य क्षेत्रातले अनेक दिग्गज कलाकार यांच्याशी गप्पांच्या माध्यमातून संवाद साधता येणार आहे. प्रकाशनानंतर प्रकाशनाच्या ठिकाणी आणि त्यानंतर सर्व पुस्तकविक्रेत्यांकडे आणि ऑनलाईन हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. दसऱ्याचं निमित्त साधून हे अक्षरसोनं लुटण्याच्या या कार्यक्रमात रसिक प्रेक्षक, वाचक म्हणून तुम्हीही सहभागी व्हा. आम्ही तुमची वाट पाहत आहोत