‘या’ अभिनेत्रीचं वयाच्या सातव्या वर्षी लैंगिक शोषण
आतापर्यंत आपण या गोष्टींविषयी मौन का बाळगलं होतं, यामागचं कारणंही तिने स्पष्ट केलं.
मुंबई : अभिनेत्री, मॉडेल पद्मलक्ष्मी हिने सोशल मीडियाच्या मदतीने तिच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या दुर्दैवी प्रसंगांचा उलगडा केला आहे. ट्विटरच्या माध्यमातून तिने आपण आतापर्यंत या गोष्टींविषयी मौन का बाळगलं होतं, यामागचं कारणंही स्पष्ट केलं.
एकामागोमाग एक काही ट्विट करत तिने हा प्रकार सर्वांसमोर उघड केला. पहिल्या वेळी माझ्यावर लैंगिक अत्याचार झाले तेव्हा मी सात वर्षांची होते, असं सांगत आपल्यावर एका नातेवाईकांनीच अत्याचार केल्याचं तिने सांगितलं.
वयाच्या सोळाव्या वर्षी आपल्याच प्रियकराने लैंगिक शोषण केल्याचं सांगत पद्मलक्ष्मीने त्या प्रसंगाचा उल्लेख ‘डेट रेप’ असा केला. ज्यानंतर पुन्हा एकदा म्हणजेच वयाच्या २३ व्या वर्षी तिला अशाच एका दुर्दैवी प्रसंगाला सामोरं जावं लागलं. त्यावेळी आपल्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही, हीच भावना तिच्या मनात घर करुन गेली होती.
आपल्यावर झालेले हे अत्याचार त्याचवेळी सर्वांसमोर उघड का केले नाहीत, याविषयी सांगत पद्मलक्ष्मीने ट्विटमध्ये लिहिलं, ‘ज्यावेळी अशा कोणत्या प्रसंगाचा सामना तुम्ही करता तेव्हा त्यातून बाहेर येण्यासाठी फार वेळ जातो. आपल्या येथे या प्रसंगांच्या वेळी सहसा पीडितांकडे दोषी म्हणूनच पाहिलं जातं, त्यामुळे या साऱ्यातून बाहेर पडण्यासाठी एक प्रकारचं धैर्य लागतं.’
गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका ट्विटनंतर #WhyIDidntReport हरा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंडमध्ये आला होता. ज्याअंतर्गतच पद्मलक्ष्मीचे हे ट्विट सध्या अनेकांचच लक्ष वेधत आहेत.