नीना गुप्तांच्या चित्रपटाला ऑस्कर मानांकन
वृंदावन आणि वाराणसीमध्ये जीवन जगणाऱ्या विधवा महिलांभोवती चित्रपटाची कथा फिरत आहे.
मुंबई : अभिनेत्री नीना गुप्ता या त्यांच्या व्यक्तीमत्वामुळे आणि बेधडक वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतात. अनेक प्रसिद्ध चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप चाहत्यांच्या मनावर पाडली आहे. आता सुद्धा त्या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. निमित्त आहे ते म्हणजे त्यांच्या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारातील फीचर फिल्मच्या यादीत नामांकन मिळालं आहे. त्यामुळे त्यांचा आनंत गगनात सामावणारा आहे.
सेलेब्रिटी शेफ ते दिग्दर्शक असा प्रवास करण्याऱ्या विकास खन्ना यांच्या 'द लास्ट कलर' या चित्रपटासाठी मानांकन मिळालं आहे. ही नव वर्षाची गोड बातमी खुद्द विकास यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. नव्या वर्षाची ही नवी सुरुवात त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
विकास यांच्या ट्विटवर रीट्विट करत नीना गुप्तांनी विश्वास बसत नाही असे वक्तव्य केले आहे. त्यादेखील अत्यंत आनंदी दिसून येत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार या यादीमध्ये कोणत्याही चित्रपटाचं नाव येण्याआधी चित्रपट लॉस एन्जेलिस येथील कमर्शल मोशन पिक्चर थिएटरमध्ये ३१ डिसेंबरआधी प्रदर्शित करावा लागतो.
शिवाय तो चित्रपट कमीत कमी ७ दिवस तो चित्रपट थिएटरमध्ये यशस्वीरित्या चालावा लागतो. मुंबई फिल्म फेस्टिवल २०१९मध्ये या चित्रपटाची स्क्रिनिंग आयोजित केली होती. वृंदावन आणि वाराणसीमध्ये जीवन जगणाऱ्या विधवा महिलांभोवती चित्रपटाची कथा फिरत आहे.