मुंबई : भारतीय नृत्य शैलीला फार मोठा इतिहास लाभला आहे. भारतीय नृत्यशैलींमध्ये ८ शास्त्रीय नृत्यशैलींचा समावेश होतो. त्यापैकी एक म्हणजे 'भरतनाट्यम' नृत्यशैली. पूर्वजांकडून मिळालेला हा नृत्यशैलीचा ठेवा आजही कायम आहे. श्री कृष्णाची बासरी आणि शंकराचा डमरू जेवढा जुना आहे, तेवढाच हा नृत्य प्रकार देखील जुना आहे. काळानुसार या नृत्यप्रकाराचे महत्व वाढताना दिसत आहे. अभिनेत्री पूर्वी भावे नृत्यप्रेमींसाठी नवीन नृत्य सीरिज घेऊन आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


'अंतर्नाद' या सीरिजच्या माध्यमातून तिने 'भज गणपती' भरतनाट्यम नृत्यशैलीतलं पहिलं गाणं रिलीज केलं आहे. या गाण्यातील विशेष आकर्षण म्हणजे हे गाणं सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका वर्षा भावे यांच्या आवाजात संगीतबद्ध करण्यात आलं आहे.     


अभिनेत्री आणि नृत्यांगना पूर्वी भावे म्हणते की, "कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात आपण विद्येचे आराध्य दैवत श्री गणेशाच्या आराधनेने आणि वंदनेने करतो. त्यामुळे मी 'अंतर्नाद' सीरिजची सुरूवात गणेश वंदनेने केली आहे, आणि यापुढील गाण्यांमधून तुम्हाला अनेक प्रकारच्या नृत्यशैली पाहायला मिळणार आहेत. मी माझ्या बालपणापासूनच या नृत्यशैलीचे प्रशिक्षण घेत आहे."


सिन्नरमधल्या गुंदेश्वर मंदिरात 'भज गणपती' गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. या चित्रिकरणाचा अनुभव सांगताना पूर्वी म्हणते की, 'हे गाणं मे महिन्यात चित्रित करण्यात आलं आहे. 


उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे जमीन फार तापायची आणि तापलेल्या त्या जमीनीवर नृत्य करणं फार कठीण होतं. त्यात वेळेची मर्यादा होती. त्यामुळे गाण्यातील कित्येक भाग एकाच प्रयत्नात चित्रित करण्यात आला आहे.


आता या आव्हानात्मक गाण्याच्या चित्रिकरणाचा आणि माझ्या प्रयत्नांचा काय निकाल लागतो याचीच प्रतिक्षा आहे.' युट्यूबवर माय लेकींच्या या प्रयत्नांना चांगला प्रतिसात मिळत आहे.