मुंबई : 'कांचली' चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री शिखा मल्होत्रा सध्या रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सेवेत व्यस्त आहे. 'कांचली' चित्रपटात तिने अभिनेता संजय मिश्रासोबत स्क्रिन शेअर केली होती. पण आता ती वेगळ्याच कामामुळे चर्चेत आली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या परिने सहकार्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. यात कलाकार देखील मागे नाहीत. बॉलिवूड फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने अभिनेत्री शिखा मल्होत्राचा फोटो शेअर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये 'शुक्रवारी शिखाने जोगेश्वरीमधील बीएमसीच्या ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करण्यास सुरुवात केली आहे. शिखाने वर्धमान  मेडीकल कॉलेज आणि दिल्लीमधील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये २०१४मध्ये नर्सिंगचे शिक्षण घेतले आहे.' असं लिहलं आहे. 



अभिनयात आवड असल्यामुळे शिखाने मेडिकल करियर मागे ठेवलं आणि आपला मोर्चा अभिनयाकडे वळवला. पण सध्या राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे तिने रुग्णांची सेवा करण्याचा विडा हाती उचलला आहे. शिवाय बीएमसीने शिखाला नर्स म्हणून काम करण्यास परवानगी दिली आहे. 


भारतात आतापर्यंत कोरोनाचे ९७९ रुग्ण झाले आहेत. मागच्या २४ तासात कोरोनामुळे ६ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १९६ एवढी झाली आहे. तर कोरोनामुळे राज्यात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई आणि ठाणेमध्ये १०७, पुण्यात ३७, नागपूर १३, अहमदनगर ३, रत्नागिरी १, औरंगाबाद १, यवतमाळ ३, मिरज २५, सातारा २, सिंधुदुर्ग १, कोल्हापूर १, जळगाव १, बुलढाणा १ अशी रुग्णांची संख्या आहे. यापैकी मुंबईतले १४, पुण्याचे १५, नागपूरचा १, औरंगाबादचा १ आणि यवतमाळचे ३ अशा एकूण ३४ जणांना डिस्चार्ज दिला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.