मुंबई : छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कॉमेडी शो चांगलाच लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातून कलाकारांना वेगळी ओळख मिळाली. कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार हा आता महाराष्ट्रातील जनतेच्या मनात घर करून बसला आहे. या कार्यक्रमातील कलाकरांनी खूप मेहनत करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. याच शोमधील सगळ्यांची लाडकी आणि कोहली कुटुंबाची सदस्य शिवाली परब ही चांगलीच लोकप्रिय आहे. आता शिवालीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सातत्याने दर्जेदार म्युझिक व्हिडिओ सादर करणाऱ्या सप्तसूर म्युझिकतर्फे मासोळी ठुमकेवाली हा नवा म्युझिक व्हिडिओ लाँच करण्यात आला आहे. अभिनेत्री शिवाली परब आणि अभिजित अमकर यांची जोडी या गाण्यात दिसणार आहे. ताल धरायला लावणारं हे गाणं सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे.  


साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष यांच्या सप्तसूर म्युझिकची निर्मिती असलेल्या मासोळी ठुमकेवाली या म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन आणि नृत्य दिग्दर्शन कृतिक माझिरे यांनी केलं आहे.हर्ष करण आदित्य (त्रिनिती ब्रोस) यांच्या शब्दांना हर्षवर्धन वावरे, करण वावरे, आदित्य पाटेकर यांनी संगीतबद्ध केलं आहे. कस्तुरी वावरे, आदित्य पाटेकर यांनी हे गाणं गायलं आहे. रोहन कंटक, निखिल वराडकर यांनी छायांकन केलं आहे. या गाण्यात शिवाली परब आणि अभिजित अमकर हे मराठी चित्रपट, मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय कलावंत आहेत. अंकित शिंदे आणि दिव्या घाग यांनी कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे.



मराठी गाण्यांमध्ये कोळी गीतांचं वेगळंच महत्त्व आहे. अनेक कोळीगीतं आजही संगीतप्रेमींच्या तोंडी असतात. त्यात आता आली हो मासोळी ठुमकेवाली असे शब्द असलेल्या मासोळी ठुमकेवाली या गाण्याची भर पडणार आहे. उत्तम शब्द असलेलं हे गाणं प्रत्येकालाच ताल धरायला लावणारं आहे. त्यामुळे शिवाली परबची मासोळी ठुमकेवाली संगीतप्रेमींच्या आणि शिवालीच्या चाहत्यांच्या पसंतीला उतरेल यात काहीच शंका नाही.


'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या शिवाली परबने आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. शिवाली अवली कोहली हे पात्र तर प्रेक्षकांना खळखळून हसवतंय. 'छोटा पॅकेट, बडा धमाका' म्हणून ओळखल्या जाणारी शिवाली रीयल लाईफमध्ये मात्र बिनधास्त आहे. आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस   फोटोंमुळे ती सोशल मीडियावर चर्चेत असते.