अफजल गुरू बळीचा बकरा, आलिया भट्टच्या आईचं वादग्रस्त वक्तव्य
अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती सोनी राझदान वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत.
मुंबई : एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती सोनी राझदान यांना अतिरेकी अफजल गुरूचा पुळका आला आहे. संसद हल्ल्ल्याचा मास्टरमाईंड असलेला अफजल राझदान यांना निष्पाप वाटतोय आणि त्याला संसद हल्ल्यात बळीचा बकरा बनवलाय, असंही त्यांना वाटत आहे. यावर टीका झाल्यानंतर त्यांनी सारवासारव करायला सुरूवात केली आहे.
प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री-निर्माती सोनी राझदान वादात अडकल्या आहे. संसद हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अफजल गुरू याचा राझदान यांना पुळका आला आहे. काश्मीरमध्ये दोन अतिरेक्यांसोबत पकडलेला डीएसपी देविंदर सिंग याच्या हल्ल्यातील सहभागाची चर्चा सुरू झालीये. त्यावरून राझदान यांनी ट्विट केलं.
'ही न्यायाची विटंबना आहे. एखादी व्यक्ती निष्पाप असेल तर त्याला मृत्यूनंतर परत कोण आणणार? त्यामुळे मृत्यूदंडाची शिक्षा किरकोळीत घेऊ नये. शिवाय अफजल गुरूला बळीचा बकरा का करण्यात आलं, याचीही चौकशी व्हायला हवी.' असं वक्तव्य त्यांनी केलं.
राझदान यांनी अफजल गुरूला निष्पाप, बळीचा बकरा इत्यादी विशेषणं वापरल्यामुळे त्यांच्यावर टीका होतेय. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांना ट्रोल केलं तसंच त्यांनी देश, संसद आणि न्यायालयाचा अपमान केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केलाय.
तो निष्पाप आहे असं कुणीच म्हटलं नाही. पण त्याचा छळ झाला असेल आणि एखादी गोष्ट करण्यास सांगितली गेली असेल तर त्याची चौकशी व्हायला नको का? देविंदर सिंगबाबत त्याचे आरोप कुणीच गांभिर्यानं का घेतले नाहीत? ही विटंबना आहे. असं ट्विट राझदान यांनी केलं.