`लहान मुलं खूप आगाऊ असतात पण...`, सुकन्या मोने यांनी सांगितला मायरासोबत काम करण्याचा अनुभव
Sukanya Mone on her Experience of Working with Myra Vaikul : सुकन्या मोने यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मायरा वायकुळ आणि तिच्या आई-वडिलांच्या ट्रोलिंगवर वक्तव्य केलं आहे. त्यासोबत त्यांनी तिच्यासोबत काम करण्याचा अनुभव देखील सांगितला आहे.
Sukanya Mone on her Experience of Working with Myra Vaikul : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय बालकलाकार अभिनेत्री मायरा वायकुळला कोणत्याही ओळखीची गरज नाही. तिच्या गोड आणि गोंडस अभिनयाची सगळेच स्तुती करत असतात. तिच्या अभिनयानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. तर दुसरीकडे काही नेटकरी तिच्या बोलण्यावरून तिला ट्रोल करताना दिसतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मायरानं केलेल्या वक्तव्यानं तिच्या वयाला शोभत नाही..तिच्या बोलण्यात अॅटिट्यूड दिसून येतो... अशा बऱ्याच गोष्टी बोलताना नेटकरी दिसतात. दरम्यान, या सगळ्या ट्रोलिंगवर अभिनेत्री सुकन्या मोने यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
सुकन्या मोने आणि मायरानं 'नाच गं घुमा' या चित्रपटात एकत्र काम केलं. या चित्रपटाच्या निमित्तानं सुकन्या मोने यांनी 'तारांगण' या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत याविषयी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. मायराविषयी बोलताना सुकन्या मोने म्हणाल्या, 'मायरासोबत माझी खूप छान मैत्री झाली. आपल्याला वाटतं ना की, लहान मुलं खूप आगाऊ असतात...आई-वडील त्यांचे लाड करत असतात. तर तिच्या बाबतीत तसं नाहीये. मला तिचं खरंच कौतुक वाटतं, त्यासोबत तिच्या आई वडिलांचं कौतुक वाटतं. त्यांनी तिला कसं वाढवलंय हे सांगायचं झालं तर, तिच्या हातात मोबाईल नसतो. ते येताना तिच्यासोबत खेळणी घेऊण येतात. आम्ही भातुकली खेळलो. वेगवेगळे खेळ खेळलो...अशी ती सेटवर असायची. झोपायच्या वेळी ती झोपायची..असं तिच्या आई वडिलांनी तिला छान वाढवलंय'
काय म्हणाली होती मायरा?
या मुलाखतीत सात वर्षांच्या मायरला तिच्या भविष्यातील प्लॅन्सविषयी विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देत मायरा म्हणाली की, 'मला माझ्या आई-वडिलांचा व्यवसाय सांभाळायचा आहे. मला माहित नाही, पुढे जाऊन काय होणार, ते फक्त देवाला माहित आहे. मी चित्रपट, मालिका करणारच आहे, पण ते सगळं त्यालाच माहित मी कसं करणार आहे.' दरम्यान, सोशल मीडियावर तिची ही मुलाखत व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं होतं.
हेही वाचा : 'मतदान यादीत माझ्याजागी वेगळंच नाव आढळलं...', अभिनेत्याचा सुयश टिळकचा संताप
मायरा विषयी बोलायचं झालं तर 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. या मालिकेत तिनं साकारलेली परी ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यानंतर मायरा ‘कलर्स टीव्ही’वरील ‘नीरजा: एक नयी पहचान’ या हिंदी मालिकेत पाहायला मिळाली.