मुंबई : झी मराठी वाहिनीवरिल जय मल्हार ही मालिका खूप गाजली होती. ही मालिका जितकी गाजली तितकंच त्यातल्या प्रत्येक पात्राला लोकप्रियता मिळाली. या मालिकेत खंडोबाची भूमिका अभिनेता देवदत्त नागेने साकारली होती तर बानूच्या भूमिकेत अभिनेत्री ईशा केसकर दिसली होती तर म्हाळसा हे पात्र अभिनेत्री सुरभी हांडेने साकारलं होतं. या पात्रातून सुरभी घरा-घरात पोहचली. सुरभीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. नुकतीच सुरभीने तिच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने नव्या सिनेमाची घोषणा केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांची कहाणी आता संघर्षयोद्धा या चित्रपटातून मांडली जाणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री सुरभी हांडे मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. एका लढवय्या कार्यकर्त्याच्या लढवय्या पत्नीची ही भूमिका असून २६ एप्रिल रोजी 'संघर्षयोद्धा' बॉक्स ऑफिसवरही धमाल उडवून देण्यासाठी सज्ज आहे.


शिवाजी दोलताडे यांनी  या चित्रपटाच्या  दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली असून सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी या चित्रपटाचं लेखन आणि निर्मिती केली असून , सहनिर्माते रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे , नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. तर डॉ.सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे,  माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर , सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत. 


मनोज जरांगे पाटीलयांच्या आजवरच्या वाटचालीत त्यांच्या पत्नीची जबाबदारी महत्त्वाची ठरलीय. मनोज जरांगे पाटील समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढत असताना घरच्या आघाडीवर त्यांची पत्नी लढत होती. त्यामुळेच जरांगे पाटील हे वादळ महाराष्ट्रभर फिरू शकलं. त्यामुळे आरक्षणासाठी लढणारा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीचा पत्नीचा संघर्षही तितकाच मोठा आहे. त्यामुळे एका लढवय्या कार्यकर्त्याच्या पत्नीच्या संघर्षाची कहाणी या चित्रपटात दाखवली जाणार आहे. ही आव्हानात्मक भूमिका अभिनेत्री सुरभी हांडे साकारत आहे. जय मल्हार, गाथा नवनाथांची, लक्ष्मी सदैव मंगलम अशा टीव्ही मालिका, अगं बाई अरेच्चा २ अशा चित्रपटांतून सुरभीनं आपल्या अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. तिच्या आजवरच्या भूमिकांमध्ये संघर्षयोद्धा चित्रपटातली भूमिका सर्वांत वेगळी ठरणार आहे. जरांगे पाटील पती-पत्नीचं नातं या चित्रपटातून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामुळे आता २६ एप्रिलपर्यंतच प्रतीक्षा करावी लागणार आहे.