मुंबई : कलाविश्वातून राजकीय विश्वाकडे वळत या क्षेत्रात एक नवी कारकिर्द सुरू करणाऱ्या खासदार नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती या कायमच सर्वांचं लक्ष वेधत असतात. पहिलीवहिली संसद भेट असो, किंवा मग शपथग्रहण विधी असो. या दोघीं चर्चेत असतातच. सध्याच्या घडीला ही जोडी चर्चेत आहे ते म्हणजे सोशल मीडियावर गाजणाऱ्या एका व्हिडिओमुळे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दुर्गापूजेच्या निमित्ताने देवीला साकडं घालणाऱ्या आणि तिची आराधना करणाऱ्या एका गाण्यावर नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती यांनी ठेका धरला आहे. दुर्गापूजेच्या निमित्ताने साकारण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये त्या दोघी अधिक सुंदर दिसत आहेत. 


सौंदर्यालाच जोड मिळाली आहे ती म्हणजे त्यांच्या नृत्यकौशल्याची. पश्चिम बंगाल आणि बंगाली समुदायात अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या दुर्गापूजेचं औचित्य साधत देवीच्या रुपाचं वर्णन करत, तिचा महिमा गात आणि तिला साकडं घालत या दोन्ही खासदारांचं वेगळं रुप सर्वांना पाहायला मिळत आहे. 



'अशे माँ दुर्गा...', असे बोल असणारं हे गीत ऐकताना ही भाषा न कळणारेही त्याच्यावर ठेका धरायला भाग पडतात अशीच त्याची मोहक धुन आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ २० लाखांहून अधिकजणांनी पाहिला आहे. कित्येकांनी तो शेअरही केला आहे. यंदाच्या वर्षी ४ ते ८ ऑक्टोबर या काळात दुर्गापूजेचा उत्साह असणार आहे. तर, २९ सप्टेंबरपासूनच नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. स्त्रीशक्तीचा जागर केल्या जाण्याच्या या दिवसांमध्ये सर्वत्र उत्साहाचं आणि सकारात्मकतेचं वातावरण पाहायला मिळतं. यंदाची अशाच चैतन्याची उधळण होणार आहे.