`कोण म्हणतं बॅालीवूडमध्येच नेपोटीझम असतं?` मराठमोळ्या अभिनेत्रीची `ही` पोस्ट वाचाच
Urmila Nimbalkar : सोशल मीडियावरील लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने एका पोस्टमध्ये तिच्यासोबत कॉलेजमध्ये घडलेल्या प्रसंगाबाबत भाष्य केलं आहे. यासोबत उर्मिलाने अपयश आलं तरी सातत्याने प्रयत्न करण्याचा सल्ला दिला आहे.
Urmila Nimbalkar : अभिनेत्री उर्मिला निंबाळकर ही अभिनय क्षेत्रापासून लांब असली तरी युट्युब चॅनल आणि सोशल मीडियावरून उर्मिलाने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. उर्मिलाने अनेक मालिकांमध्ये काम देखील केलं आहे. मात्र तिला एका मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचे उर्मिलाने सांगितलं होतं. यानंतर ती छोट्या पडद्यावर दिसली नाही. मात्र कॉलेजलाईफमध्येही उर्मिलाला अडचणींचा सामना करावा लागल्याचे नुकतंच तिने सांगितले आहे. उर्मिलाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत नेहमी प्रयत्न करत राहण्याचा सल्ला दिला आहे.
अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. उर्मिला फर्ग्युसन महाविद्यालयात मुक्तछंद या कार्यक्रमास प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित होती. याच महाविद्यालयात उर्मिलाच्या कॉलेजच्या काळात घडलेल्या प्रसंगाबाबत या पोस्टमध्ये तिने भाष्य केलं आहे. उर्मिलाने या पोस्टमधून नेपोटीझमवर भाष्य करताना अपयश आलं तरी सातत्याने प्रयत्न करण्याचा सल्ला दिला आहे.
काय म्हटलंय उर्मिलाने?
'कोण म्हणतं बॅालीवूडमध्येच नेपोटीझम असतं? आज ना एक full circle पूर्ण झालं... Fergussonमध्ये 2nd year ला असताना पुरूषोत्तम एकांकीका स्पर्धेसाठी कॅालेजच्या टीममध्ये जायचं होतं. स्वप्नच होतं ते. त्याआधी झालेल्या workshop मध्ये पण रितसर निवड वगैरे झाली. मी खूप खुश. पण दुस-या दिवशी जेव्हा कॅालेजमध्ये गेले तेव्हा वेगळ्याच गोष्टी घडल्या होत्या. कोण म्हणतं नेपोटीझम फक्त बॅालीवूडमध्ये होतं… कॅालेजमध्ये काही सेलीब्रेटीजची पोरं होती आणि त्यांचा कलामंडळात खूप दबदबा होता. त्यांनी स्वतःच्या आईबापांच्या मदतीने दबाव आणून संपूर्ण संघ बदलला आणि गावातून आलेली एक पोरगी outsider थेट onstage करेल हे कसं होईल आणि मला संघातूनच काढण्यात आलं. मी खूप भांडले पण काहीच झालं नाही, मला बॅकस्टॅजला तरी घ्या म्हणत होते पण त्यांना माझी थ्रेटच नको होती. म्हणून काढलं आणि काहीच होत नाही म्हणून मी बाहेर आले तेव्हा त्यातल्या एका सेलिब्रेटी कीडने मला - उर्मिला तुझी उंचीही कमी आहे आणि तुझा दर्जाही कमी आहे, तुला संघात घूसून पण देणार नाही असं म्हणून हिणवले, तेव्हा मी याच मेन बिल्डींगच्या बाहेर येऊन खूप रडले… Cut to आज Fergussonच्या तितक्याच फेमस मुक्तछंद या कार्यक्रमात मला प्रमुख अतिथी म्हणून बोलवण्यात आलं. ज्या मेन बिल्डींगच्या बाहेर मी रडले त्याच्याच बाहेर आज विद्यार्थ्यांचा सेल्फी घेण्यासाठी मोठ्ठा गराडा होता, असंख्य मुली मला भेटून तुझ्या कन्टेटमुळे आम्हाला दिशा मिळली आणि आमच्या आयुष्यात किती सकारात्मक बदल होतोय असं भरभरून सांगत होत्या. तिथल्या शिक्षक मंडळींच्या डोळ्यात खूप प्रेम होतं आणि त्यातला एका शिक्षकांना मी पाया पडले तेव्हा मला रडतानाची तू अजून आठवते आहेस खूप मोठ्ठी झालीस पोरी, अजून पुढे जायचंय असं म्हणून पाठ थोपटली. खरं तुमच्याशी सगळं शेअर करण्याचा हेतू माझ्यावर किती अन्याय झालाय, मी किती भारी असं सांगण्याचा मूळीच नाही. मला माहितीये अगदी शालेय वयापासून नोकरीपर्यंत कित्तेक मुला-मुलींना पात्रता असून सुध्दा डावलण्यात येतं. नवीन काहीतरी उत्साहाने प्रामाणिकपणाने करण्याची इच्छा असणारे outsiders प्रस्थापितांना नकोच असतात, त्यामुळे हे होणारच. मला एवढंच सांगायचंय की म्हणून आपण धडका मारायचं थांबायचं नसतं… फक्त एक संधी गेली, दोन गेल्या, तीन गेल्या, चार गेल्या तरीही स्वतःला कसलीही सहानभूती न देता, excuse न देता आपण आपले प्रयत्न चालूच ठेवायचे, उलट असे सेटबॅक्सच आपल्यात अजून जास्त आग लावतात आणि त्वेषाने काम करण्याचं बळ देतात... म्हणून चला धडका मारत राहूयात!,' असं उर्मिलालाने तिच्या इन्स्टा पोस्टमध्ये म्हटलं आहे.