Adipurush VFX मागील मराठमोळा चेहरा प्रसाद सुतार आहे तरी कोण?
Prasad Sutar VFX Adipurush: सध्या चर्चा आहे ती म्हणजे `आदिपुरूष` या चित्रपटाची. हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला असला तरीसुद्धा या चित्रपटाला ट्रोल आणि रोस्ट करण्यात आलं आहे. सर्वाधिक खिल्ली या चित्रपटाच्या व्हिएफएक्सची उडवली गेली आहे परंतु तुम्हाला माहितीये का की या चित्रपटाला व्हिएफएक्स देणारे प्रसाद सुतार कोण?
Who Made VFX of Adipurush: मॉडर्न टेक्नोलॉजी. हा शब्द जरी उच्चारला तरी आपल्यासमोर काय येत? आयफोन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि व्हिएफएक्स. सध्या व्हिएफएक्स हा शब्द सगळीकडेच ट्रेण्ड होतो आहे आणि सोबतच ट्रेण्ड होतोय आदिपुरूष या चित्रपटातला व्हिएफएफ्स. सध्या या चित्रपटाच्या माध्यमातून वापरण्यात आलेल्या व्हिएफएक्सला प्रचंड प्रमाणात ट्रोल केलं आहे. त्यासोबत हे तंत्रज्ञान वापरून बॉलिवूडनं रामायणासारख्या जगविख्यात लोकप्रिय कथेची खिल्ली उडवल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु तुम्हाला माहितीये का या चित्रपटाचे व्हिएफएक्स करणारे प्रसाद सुतार कोण आहेत? त्यांना या क्षेत्रात 25 वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे सध्या त्यांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
तेव्हा या लेखातून जाणून घेऊया व्हिएफएक्स आर्टिस्ट प्रसाद सुतार यांच्याबद्दल. 2015 साली प्रसाद सुतार यांनी सुपरव्हायजर नवीन पॉलसोबत पार्टनरशिप केली आणि अजय देवगणच्या प्रॉडक्शन हाऊसच्या सहयोगानं त्यांनी NY VFX वाला ही स्वत:ची कंपनी सुरू केली. मध्यंतरी ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी एक स्टेटमेंट शेअर केलं होतं. जे प्रसाद सुतार यांच्या कंपनीचे होते. या स्टेटमेंटमध्ये त्यांनी लिहिलं होतं की 'आदिपुरूष' या चित्रपटासाठी त्यांच्या कंपनीनं काम केलं नाही. आम्ही हे ऑन रेकॉर्ड सांगतोय कारण आम्हाला माध्यमांकडून याबद्दल सतत विचारलं जातं आहे. 'आदिपुरूष' या चित्रपटासाठी प्रसाद यांनी स्वत:हून कामं केलंय त्यात ही कंपनी सहभागी नव्हती.
इंडिया टूडेला त्यांनी एक मुलाखत दिली आहे. ज्यात त्यांनी 'आदिपुरूष' या चित्रपटाला ट्रोल करण्यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, आम्ही गोष्टी काही पुर्णत: बदलू शकत नाही. ट्रोलिंगनंतर अॅनिमेशनमधल्या पात्रांना पुन्हा दुरूस्त करणं हे आव्हानं होतं. आम्ही ते चांगलं करू शकलोय. आम्हाला मिळालेल्या कमीत कमी वेळेत आम्ही गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही त्याला अधिक वास्तवदर्शी बनवण्याचा प्रयत्न करतो आहोत.
कोण आहेत प्रसाद सुतार?
1998 पासून त्यांनी या क्षेत्रात काम करायला सुरूवात केली असून 150 हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी हे तंत्रज्ञान वापरलं आहे. 'बाजीराव मस्तानी' आणि 'तान्हाजी' या चित्रपटासाठी व्हिएफएक्स दिले आहेत. त्यासाठी त्यांना पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. फिल्मफेअर पुरस्करानंही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. सध्या 'आदिपुरूष' हा चित्रपट नेटकऱ्यांच्या रडारवर आला आहे. त्यामुळे प्रदर्शनानंतर म्हणजे 16 जूननंतर आत्तापर्यंत या चित्रपटाला मोठ्या समीक्षकांकडून आणि प्रेक्षकांकडून टीकेला सामोरे जावे लागते आहे.