मुंबई : समलैंगिक, तृतीयपंथी आणि तत्सम संकल्पना किंबहुना वास्तव मगील काही वर्षांपासून न्यूनगंडाच्या विषयाच्या कक्षेतून बाहेर येताना दिसत आहे. सर्वसामान्यांमध्येही या गोष्टींना स्वीकृती मिळताना दिसत आहे. या व्यक्तीही समाजातीलच एक महत्त्वाचा घटक आहे ही बाब आता लोकं अतिशय सकारात्मकतेनं स्वीकारू लागले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठराविक व्यक्तींनाही त्यांचे हक्क असतात आणि त्या हक्कांच्या आड समाजही येऊ शकत नाही हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे. अतिशय संवेदनशील अशा या मुद्द्याला नुकतंच एका जाहिरातीच्या माध्यमातून हाताळण्यात आलं आहे. 


ट्रान्सवुमन अशी ओळख सांगणाऱ्या मीरा सिंहानिया हिनं या जाहिरातीमध्ये मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. कोणताही संवाद नाही, फक्त भावना, कलाकारांचा अभिनय आणि पार्श्वसंगीताच्या बळावर केरळस्थित भीमा ज्वेलर्स या जवळपास 96 वर्षे जुन्या ब्रँडसाठी ही अतिशय परिणामकारक जाहिरात साकारण्यात आली. 


मीरा नेमकी कशी जन्मली याचीच झलक या जाहिरातीच्या निमित्तानं पाहायला मिळत आहे. जाहिरातीत दाखवल्याप्रमाणं आपल्या मुलाला मुलींच्या सवयींमध्ये रस आहे आणि त्याचा कलही त्याच दिशेनं आहे हे कळताच आईवडील ज्या सकारात्मकतेनं या साऱ्याचा स्वीकार करतात हे अतिशय सुरेखपणे साकारण्यात आलं आहे. 



काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या जाहिरातीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून कलेचा हा अप्रतिम नमुना सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे. विविध धाटणीचे विषय हाताळत जाहिराती साकारणाऱ्या या क्षेत्रात हा व्हिडीओ म्हणजे खऱ्या अर्थानं एक मैलाचा दगडच प्रस्थापित करुन गेला आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.