नवी दिल्ली : आपल्या आवाजाने श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेणारे पाकिस्तानी सूफी गायक राहत फतेह अली खान एका अडचणीत सापडले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाकडून त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. चलन तस्करी केल्याच्या आरोपामुळे त्यांच्या नावे ही नोटीस पाठवण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जवळपास दोन कोटी रुपयांच्या चलन तस्करीचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला असून, येत्या ४५ दिवसांत त्यांनी या प्रकरणी उत्तर देणं अपेक्षित आहे. राहत यांनी दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्यास ईडीकडून त्यांच्यावर तस्करी केलेल्या रकमेवर ३०० टक्के दंड आकारला जाऊ शकतो. 



पाकिस्तानी गायकाविरोधातील या प्रकरणाची मुळं ही २०१४ पासून प्रकाशझोतात आली होती. जेव्हा Foreign Exchange Management Act (FEMA) म्हणजेच परकीय चलन व्यवस्थापन कायद्याअंतर्गत या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला होता. २०११ मध्ये दिल्ली विमानतळावर राहत आणि त्यांच्या मॅनेजरकडून १.२४ लाख डॉलरची अघोषित रक्कम जप्त करण्यात आली होती. त्यावेळी आपण कोणतंही चुकीचं काम नसल्याची माहिती त्यांनी दिली होती. आपण आपल्या संपूर्ण टीमसह प्रवास करत असल्यामुळेच इतकी जास्त रक्कम सोबत नेत असल्याचं कारण त्यावेळी त्यांनी दिलं होतं. त्यामुळे आता येत्या दिवसांमध्ये राहत त्यांना पाठवण्यात आलेल्या या नोटीसला काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.