आर्यन खाननंतर आणखी एका सेलिब्रिटीचं घर आणि कार्यालय एनसीबीच्या रडारवर
सेलिब्रिटींवर एनसीबीची करडी नजर...
मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) रेव्ह पार्टी प्रकरणी मुंबईच्या वांद्रे परिसरात छापेमारी करत आहे. एनसीबीची टीमने आता वांद्रे येथील चित्रपट निर्माता इम्तियाज खत्रीच्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकले आहेत. त्यामुळे आता बॉलिवूड आणि ड्रग्स प्रकरणाला कोणतं वळण लागेल हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. रेव्ह पार्टी प्रकरणात अडलेल्या अचित कुमारच्या चौकशीत इम्तियाज खत्रीचे नाव पुढे आले. गेल्या वर्षी, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात इम्तियाज खत्रीचे नाव देखील समोर आले होते परंतु त्यानंतर त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, NCBची टीम चित्रपट निर्माते आणि उद्योगपती इम्तियाज खत्रीच्या घरी पहाटे पोहोचली आणि छापेमारी अजूनही सुरू आहे. क्रूझ ड्रग्स प्रकरणात नाव आल्यानंतर एनसीबी इम्तियाज खत्रीच्या वांद्रे येथील घरी आणि कार्यालयात छापेमारी करण्यासाठी पोहोचले आहे.
दरम्यान. एनडीपीएस न्यायालयाने शुक्रवारी ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आलेला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह 8 आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला. न्यायालयाच्या निर्णयापूर्वीच आर्यन खानसोबत आर्थर रोड जेलमध्ये पोहोचला होता. यापूर्वी गुरुवारी न्यायालयाने आर्यन खानसह आठ आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.