Pulwama Attack : पाकिस्तानी गायक नकोच, सलमानची भूमिका
या निर्णयानंतर एक महत्त्वाचं पाऊल उचलल्याचं कळत आहे.
मुंबई : 'ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन' या संघटनेकडून पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्याची अधिकृत घोषणा केल्यानंतर आया या बंदच्या दृष्टीने कलाविश्वात काही पावलं उचलली जात असल्याचं कळत आहे. पाकिस्तानी कलाकारांविरोधातील भूमिका घेत आता बॉलिवूडमध्ये 'दबंग खान' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता सलमान खाननेही या निर्णयानंतर एक महत्त्वाचं पाऊल उचलल्याचं कळत आहे.
'पिंकव्हिला'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सलमानने त्याच्या निर्मितीसंस्थेअंतर्गत साकारल्या जाणाऱ्या 'नोटबुक' या चित्रपटातून पाकिस्तानी गायकाला वगळण्याचा निर्णय घेतला आहे. आतिफ अस्लम या चित्रपचासाठी गाणं गायलं. पण आता त्याच्याऐवजी दुसऱ्या गायकाची निवड करण्यात आल्याचं कळत आहे. इतकच नव्हे, तर येत्या दोन दिवसांमध्ये या गाण्याचं नव्या गायकाच्या आवाजात पुन्हा ध्वनिमुद्रण करण्यात येणार आहे. याविषयीची अधिकृत घोषणा अद्यापही करण्यात आली नसली तरीही एकंदर तणावाची परिस्थिती पाहता पुढील अडचणी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.
जम्मू- काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात १४ फेब्रुवारीला झालेल्या आत्मघाती हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानविषयी प्रचंड संताप भारतीयांच्या मनात पाहायला मिळत आहे. दहशतवादी संघटनांना त्यांच्याकडून असणारा पाठिंबा तातडीने थांबवण्यात यावा अशी ताकिदही पाकिस्तानला देण्यात आली आहे. फक्त भारच नव्हे, तर इतर राष्ट्रांनीही या घटनेचा निषेध करत दहशतवादाला आसरा देणाऱ्या राष्ट्राविषयी संताप व्यक्त केला. ही एकंदर परिस्थिती पाहता भारतात आता पाकिस्तानी कलाकारांवर पूर्णपणे बंदी घालण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.