`ही स्त्री जातीची शोकांतिका `, हेमांगी कवीनंतर प्रेग्नेंसीत ट्रोल करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली
अभिनेत्री हेमांगी कवीने शेअर केलेल्या `बाई, ब्रा आणि बुब्स` या लेखाची जोरदार चर्चा सुरु असतानाच आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीने सोशल मिडीयावर एक बेधडक पोस्ट शेअर केलीये.
मुंबई : अभिनेत्री हेमांगी कवीने शेअर केलेल्या 'बाई, ब्रा आणि बुब्स' या लेखाची जोरदार चर्चा सुरु असतानाच आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीने सोशल मिडीयावर एक बेधडक पोस्ट शेअर केलीये. गरोदरपणातील फोटो शेअर केल्याने इतर स्त्रियां तिला कशाप्रकारे ट्रोल करत आहेत, हे तिनं आपल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे.
अभिनेत्री आणि मराठमोळी युट्यूबर उर्मिला निंबाळकरने पतीसोबत एक खास फोटोशूट करत आपण आई होणार असल्याची गुड न्यूज काही महिन्यांपूर्वी चाहत्यांसोबत शेअर केली होती. उर्मिला निंबाळकर अभिनयासोबत उत्तम फॅशन डिझाईनर देखील आहे. तिचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे. त्यामुळे चाहत्यांना ती नेहमी खास टिप्स देत असते.
तिने स्वत:चा प्रेग्नेंसीमधील एक खास vlog देखील बनवला होता. तिच्या VLOG ला फॅन्सची मोठ्या प्रमाणात पसंती मिळली होती. त्यात उर्मिला गरोदरपणातील सुखद क्षणांची अनुभूती घेत असताना , ती आपल्या पोस्टच्या माध्यमातून आपला अनुभव शेअर करत आहे.
पण चाहत्यांसोबत या गोष्टी शेअर करत असताना तिला आलेल्या प्रतिक्रिया तिने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये सांगितल्या आहेत . गरोदरपणातील काही फोटो पोस्ट केल्यानंतर महिलांकडूनच तिला कशाप्रकारे ट्रोल करण्यात आलं हे तिने सांगितलंय. आणि त्यावर या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देखील तिने दिलं आहे.
उर्मिलाला ट्रोल करताना वापरल्या जाणाऱ्या कमेंटमधील मजकूर तिने या पोस्टमध्ये लिहिल्या आहेत.
"आमचं बाळ काय ढगातून पडलंय का?", "एवढं काय हिचं प्रेगन्सीचं कौतुक?", "कोणाला काय पोटं येत नाहीत का?", मागच्या नऊ महिन्यात या सगळ्या कमेंट्स, मला स्त्रीयांनीच पाठवल्या आहेत, स्त्री असून दुसऱ्या स्त्रीच्या आनंदात आणि वेदनेच्या अतिशय सारख्याच प्रवासातही आपण तिला साथ देऊ शकत नाही, ही स्त्री जातीची शोकांतिका आहे," असा टोला उर्मिलाने सुरुवातीला लगावला आहे.
पुढे उर्मिला म्हणते, "पण एक स्त्री म्हणून मी इतर स्त्रीयांना सांगेन, जेवढे हे क्षण टिपता येत असतील, तेवढे टिपून घ्या. या संपुर्ण प्रवासाचा खुप आनंद लूटा. हे सुंदर, जादुई क्षण अतिशय पटकन संपून जातात आणि पुन्हा कधीच परत येत नाहीत. (त्यासाठी डायरेक्ट दुसरं बाळ जन्माला घालावं लागतं) मला तर विश्वासच बसत नाहीये की, माझा नववा महिना सुद्धा संपायला आता काही दिवसंच राहिलेत. आनंद, उत्साह आणि फक्त या दिव्य व्यवस्थेचे निरीक्षण करत मी कृतज्ञता व्यक्त करत आहे."
त्यामुळे हेमांगी नंतर उर्मिलाने शेअर केलेली ही पोस्ट स्त्री जातीची ही शोकांतिका सांगणारी आहे.