Priya Berde on life after Laxmikant Berde's Death : दर्जेदार अभिनय आणि कॉमेडीचा परफेक्ट टायमिंगसाठी दिग्गज अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे ओळखले जातात. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी चित्रपटसृष्टीला एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवलं असं म्हणायला हरकत नाही. त्यांचे चित्रपट आजची पिढी देखील हसत-हसत पाहत असते. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी फक्त मराठी नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीत देखील अप्रतिम काम केलं आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनाला बराच काळ झाला असला तरी त्यांनी प्रेक्षकांच्या मनात मिळवलेली जागा दुसरं कोणी घेऊ शकत नाही. दरम्यान, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला चित्रपटसृष्टीकडून कशी वागणूक मिळाली याविषयी त्यांची पत्नी प्रिया बेर्डे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलिकडेच प्रिया बेर्डे यांनी  मित्र म्हणे या पॉडकास्टवर हजेरी लावली होती. यावेळी प्रिया बेर्डे यांनी चित्रपटसृष्टीत लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलांना अपमानास्पद आणि वाईट वागणुक दिली याविषयी खुलासा केला आहे. प्रिया याविषयी बोलताना म्हणाल्या की जी व्यक्ती त्या प्रसंगातून जाते तिलाच कळतं की काय होतंय. त्यांना कोणत्या गोष्टीचा सामना करावा लागतो हे फक्त त्यांना कळतं. त्यावेळी मी खूप एकटी पडले होते. मला आई-वडील नाहीत आणि त्याचे आई-वडीलही नव्हते,  मला भाऊ बहीण नाहीत, ते असते तरी त्यांनी माझ्या मुलांचा सांभाळायला हवं मी अशी अपेक्षा मुळीच केली नसती. माझे सासरचे नातेवाईक होते पण त्यांचं देखील एक कुटुंब आहे. मला त्यांना त्रास द्यायचा नव्हता त्यामुळे मी माझ्या मुलांना हॉस्टेलला टाकलं. त्यानंतर मी माझ्या कामाला सुरुवात केली. माझ्या मुलांना मी दोन-दोन महिन्यांनी मोठं होतांना पाहिलं आहे. 



पुढे लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलांना चित्रपटसृष्टीत कशी वागणूक मिळाली याविषयी सांगताना प्रिया बेर्डे म्हणाले की 'ज्यावेळी माझी मुलं या क्षेत्रात आली त्यावेळी मी त्यांना सांगितलं की, तुम्ही लक्ष्मीकांत बेर्डेची मुलं आहात म्हणून तुम्हाला 2-3 सिनेमा मिळतील. पण, पुढे काय? त्यामुळे तुम्हालाच मेहनत करुन स्वत:चं नाव कमवायचं आहे. त्यामुळे इथे आल्यावर त्यांनीही खूप मेहनत घेतली आहे. पण, इंडस्ट्रीतील अनेक लोक आजही त्यांना टोमणे मारतात. 'तुम्ही काय लक्ष्मीकांत बेर्डेची मुलं' असं म्हणून लोक सर्रास त्यांना टोमणे मारतात. आम्हाला खूप वाईट अनुभव आलेत ना. अनेक मोठ्या लोकांकडून असेही अनुभव आले जे मी सांगू शकत नाही. खूप मोठी नावं आणि त्यांनी खूप वाईट पद्धतीने वागणूक दिलीये.' 


हेही वाचा : सलमान खानच्या बाल्ड लूकची सर्वत्र चर्चा, खरं कारण आलं समोर...


पुढे प्रिया बेर्डे म्हणाल्या की 'अभिनयला असे अनेक अनुभव आले आहे. ज्या लक्ष्मीकांत बेर्डेला लोकांनी एवढं प्रेम दिलं, त्याच्याच मुलाला हे लोक अशी वागणूक देतात. कारण त्याचा बाप जिवंत नाही ना. ते असते तर गोष्ट वेगळी आहे. त्यामुळे हे स्ट्रगल फार वेगळं आहे. लोकांच्या मनात प्रेम असतं असं म्हणतात पण असं काही नसतं. माझ्या मुलांना इथे खूप सहन करावं लागलं आहे. त्यांना खूप अपमान सहन करावा लागला आहे. त्यामुळे बराच काळ आमच्या घरातील वातावरण बिघडलं होतं.'