मुंबई : बॉलिवूडच्या कपूर घराण्यात दरवर्षी गणपती बाप्पाचं मोठ्या धूम-धडाक्यात स्वागत केलं जातं. गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु असलेली कपूर कुटुंबातील गणेश चतुर्थी उत्सवाची परंपरा बंद होण्याच्या मार्गावर आहे. दरवर्षी आर. के स्टुडिओमध्ये गणपती बाप्पाचं स्वागत करण्यात येत होतं. मात्र यंदा कपूर कुटुंबात गणोशोत्सव साजरा करण्यात येणार नसल्याचं समोर आलं आहे. आर. के स्टुडिओ विकल्यानंतर आता गणेशोत्सव साजरा करण्यात येणार नसल्याचा निर्णय कपूर कुटुंबाकडून घेण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवंगत अभिनेते राज कपूर यांनी कपूर कुटुंबात गणपती उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली होती. आर. के. स्टुडिओमध्ये हा उत्सव साजरा करण्यात येत होता. राज कपूर यांनी सुरु केलेली गणपती उत्सवाची परंपरा यांच्या दोन्ही मुलांनी रणधीर आणि ऋषी कपूर यांनी कायम ठेवली होती.


'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, रणधीर कपूर यांनी गणेश चतुर्थी उत्सवाबाबत बोलताना सांगितलं की, २०१८ मधील गणपती उत्सव आमच्यासाठी शेवटचा होता. आर. के. स्टुडिओचं नाही तर कुठे करणार? वडिलांनी ७० वर्षांपूर्वी ही परंपरा सुरु केली होती. आता आमच्याकडे अशी जागाच नाही जिथे आम्ही आर. के. स्डुडिओप्रमाणेच उत्सव साजरा करु शकू. आमची बाप्पावर अतिशय श्रद्धा आहे, पण आता आम्ही ही परंपरा सुरु ठेवू शकत नसल्याचं त्यांनी सांगितलं.


आर. के. स्डुडिओमध्ये होळी आणि गणेशोत्सव हे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जात होते. 



आर. के. स्डुडिओ १९८४ मध्ये चेंबूरमध्ये उभारण्यात आला होता. पहिल्यांदा राज कपूर आणि नरगिस यांच्या 'आग' या चित्रपटाची निर्मिती आर. के. स्डुडिओच्या बॅनरखाली करण्यात आली होती.


२०१७ मध्ये आर. के स्टुडिओच्या स्टेज नंबर १ वर 'सुपर डान्सर' या डान्स रिअ‍ॅलिटी शोचा सेट उभारण्यात आला होता. या सेटवर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. आधी सेटवरच्या पडद्यांनी पेट घेतला आणि मग संपूर्ण स्टेज जळून खाक झाला होता. 


आर.के. स्टुडिओला लागलेल्या भीषण आगीनंतर स्टुडिओचं आणि त्यात संग्रहीत केलेल्या स्मृतींचंही मोठं नुकसान झालं होतं. त्यानंतर आता तो पुन्हा उभा करणं शक्य नव्हतं. अखेर अनेक चित्रपटांचा साक्षीदार असणारा हा स्टुडिओ कपूर कुटुंबीयांनी विकण्याचा निर्णय घेतला. आता रियल इस्टेटमधील प्रसिद्ध 'गोदरेज प्रोपर्ट्रीज' कंपनीने आर.के स्टुडिओची जमीन खरेदी केली आहे. आर.के स्टुडिओ आता केवळ कागदोपत्री आणि आठवणीतच राहिला आहे.