सुभेदारनंतर आता दिग्पाल लांजेकर घेऊन येतोय ‘शिवरायांचा छावा’! पाहा पहिली झलक
मराठा साम्राज्याची शौर्यगाथा दाखवणारा ‘शिवरायांचा छावा` हा सिनेमा नवीन वर्षात, म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२४ ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
‘सुभेदार’, ‘शेर शिवराज’, ‘पावनखिंड’ आणि ‘फत्तेशिकस्त’ यांसारख्या भव्य ऐतिहासिक सिनेमांसाठी दिग्पाल लांजेकर ओळखले जातात. पुरस्कार विजेते लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि 'मल्हार पिक्चर कंपनी' यांनी ‘शिवरायांचा छावा’ या आगामी ऐतिहासिक सिनेमाचे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आणले आहे. मराठा साम्राज्याची शौर्यगाथा दाखवणारा ‘शिवरायांचा छावा' हा सिनेमा नवीन वर्षात, म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२४ ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
“छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम मोठ्या पडद्यावर साकारायला मिळणं हे माझे परमभाग्यच आहे असे मी मानतो”, या शब्दांत लेखक- दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांनी ‘शिवरायांचा छावा’ या ऐतिहासिक सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करताना त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
या सिनेमाविषयी बोलताना ‘मल्हार पिक्चर कंपनी’ यांनी म्हटले की, “ऐतिहासिक सिनेमा बनवणे हे आमचे कायमच स्वप्नं होते आणि त्यातही महाराष्ट्राचे लाडके युवराज छत्रपती संभाजी महाराजांची यशोगाथा मांडता येणं यापेक्षा दुसरे भाग्य काय असेल. हा सिनेमा करताना घेतला गेलेला अतिशय उत्तम आणि महत्त्वाचा निर्णय म्हणजे दिग्पाल लांजेकर यांची लेखक आणि दिग्दर्शक म्हणून केलेली निवड. या ऐतिहासिक कथेच्या दिग्दर्शनासाठी त्यांच्याशिवाय दुसरे कोणते नाव आमच्या डोक्यात आलेच नाही. त्यांचा इतिहासाचा असलेला अभ्यास आणि त्यांची अभ्यासू वृत्ती ही खरोखर वाखणण्या जोगी आहे.
ते पुढे म्हणाले, आमचा पहिलाच सिनेमा आणि तोही छत्रपती संभाजी महाराजांवर, त्यामुळे काम करताना बराच तणाव आहे पण आम्हाला खात्री आहे की दिग्पाल लांजेकर यांनी तयार केलेल्या या उत्तम कलाकृतीतून आम्ही प्रेक्षकांना योग्य ती माहिती मनोरंजनाच्या माध्यमातून नक्कीच देऊ शकतो.”
निर्माते वैभव भोर आणि किशोर पाटकर निर्मित ‘शिवरायांचा छावा’ या सिनेमाचे सहयोगी निर्माते भावेश रजनीकांत पंचमतिया हे आहेत तर कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी प्रखर मोदी यांनी पेलली आहे. ‘मल्हार पिक्चर कंपनी’ बॅनरच्या अंतर्गत तयार होणा-या ‘शिवरायांचा छावा’ या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे.
या सिनेमात चिन्मय मांडलेकर, तृप्ती तोरडमल, प्रसन्न केतकर, अभिजीत श्वेतचंद्र आणि मृणाल कुलकर्णी या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या असून हा सिनेमा पुढील वर्षी १६ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
'शिवरायांचा छावा' हा सिनेमा एक भव्यदिव्य कलाकृती म्हणून सिनेसृष्टीमध्ये नाव कमवेल अशी खात्री वाटते. या सिनेमामध्ये मराठ्यांचे धैर्यवान राजे छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांच्या किशोरवयात दाखवलेले धाडस आणि शौर्य आणि त्यापुढील त्यांच्या आयुष्यात झालेले बदल मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आलेला आहे.