सुशांतच्या आत्महत्येनंतर आयुषमानला करण जोहरसोबत आलेला `अनुभव` व्हायरल
सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीवरून देखील तुफान चर्चा रंगत आहे.
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतने रविवारी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमागे नेमकं कारण काय आहे, हे अद्याप समोर आलेलं नाही. एम. एस धोनी फेम अभिनेता मानसिक तणावाखाली जगत होता अशा अनेक चर्चा सध्या रंगत आहेत. सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीवरून देखील तुफान चर्चा रंगत आहे. सध्या अभिनेता आयुषमान लिखित ‘क्रॅकिंग द कोड : माय जर्नी इन बॉलिवूड’ पुस्तकातील काही ओळी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामध्ये दिग्दर्शक करण जोहरने कशाप्रकारे आयुषमानला ऑडिशनसाठी नाकारलं हे नमुद करण्यात आलं आहे.
आयुषमानने स्वतःच्या कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपलं स्थान पक्के केलं आहे. अभिनय क्षेत्रात काम करण्यापूर्वी तो रेडिओ जॉकी म्हणून काम करत होता. त्यावेळी त्याने करण जोहरची मुलाखत घेतली होती. २००७ साली त्याने करणकडे आपल्याला अभिनेता होण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा करणने त्याच्या ऑफिसचा लँडलाइन नंबर आयुषमानला दिला.
तेव्हा पुस्तकामध्ये आयुषमान म्हणतो, 'मला नंबर मिळाल्यामुळे मी फार आनंदी होतो. त्यानंतर मी त्यांनी दिलेल्या नंबरवर फोन केला, तेव्हा करण जोहर ऑफिसमध्ये नाही. तिसऱ्या दिवशी फोन केला तर करण कामात व्यास्त आहेत असं सांगण्यात आलं. चौथ्या दिवशी फोन केला तर आम्ही फक्त सेलिब्रिटींसोबत काम करतो. तुमच्यासोबत काम करू शकत नाही.' असं आयुषमानने त्याच्या पुस्तकात म्हटलं आहे.
दरम्यान सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेक सेलिब्रिटींचे सोशल मीडियावरील चाहत्यांची संख्या कमी झाली आहे. तर अभिनेत्री कंगना रानौत सारख्या कलाकारंच्या चाहत्यांच्या यादीत वाढ झाली आहे.