सुषमा अंधारेंच्या टीकेनंतर `या` व्यक्तीने शरद पोक्षेंना म्हटलं माथेफिरु! आरक्षणाच्या पोस्टवरुन संताप
मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांची मुलगी पालयट झाल्यानंतर तिचे कौतुक करताना आरक्षणाचा उल्लेख केला आहे. यामुळेच आता त्यांच्या पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
Sushma Andhare On Sharad Ponkshe : मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांची मुलगी पालयट झाली आहे. पायलट झाल्यानंतर लेकीचे कौतुक करताना शरद पोक्षें यांनी फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमध्ये आरक्षणाचा उल्लेख केला आहे. शरद पोंक्षे यांच्या या आरक्षणाच्या पोस्टवरुन चांगलाच वाद झाला आहे. लेकीचं कौतुक करताना क्षुद्र किंवा नालायकपणा दाखवायलाच हवा का? असा प्रश्न उपस्थित करत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शरद पोंक्षे यांच्यावर सडकून टीका केली. यानंतर आता अभिनेते किरण माने यांनी एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी शरद पोंक्षे यांच्या लेकीचं कौतुक करत त्यांच्या मात्र माथेफिरु असा उल्लेख केला आहे. शरद पोंक्षे यांनी पोस्टमध्ये आरक्षणाचा उल्लेख केल्याने मनोरंजन व राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत.
काय आहे शरद पोंक्षे यांची वादग्रस्त पोस्ट?
“कु सिध्दी शरद पोंक्षे आज पायलट झाली. ईयत्ता ४ पासून तिने पाहीलेलं स्वप्न पुर्ण झालं. अत्यंत खडतर परीस्थितीतून,माझं आजारपण,कोरोना, लॉकडाऊन, आर्थिक स्थिती बिकट हे सगळे अडथळे पार करत.कोणतीही सवलत,आरक्षण नसताना केवळ मेहनत ,बुध्दीमत्ता ,परिश्रम व निष्ठा ह्या जोरावर ती पायलट झाली.बापाला आणखी काय हव नाही का? आज अभिमान अभिमान फक्त अभिमान वाटतोय तूझा सिध्दी.मोठी हो पुढे देशाची सेवा कर. उत्तम सेवा दे.करशिलच खात्रीच आहे. लव यू बाळा”, असे शरद पोंक्षेंनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
किरण माने यांची शरद पोंक्षेवर अप्रत्यक्ष टीका
पोरी, नव्या जगात नवी उड्डाणं घे.
तुझ्या करीयरनं छान 'टेक ऑफ' घेतलाय. आता तू जगभर फिरशील... मात्र सगळ्या सीमा पार करून खुल्या आसमंतात भरारी घेताना तुला आश्चर्याचे अनेक धक्के बसतील... घरात लहानपणापासून तुझ्या घरातल्या जवळच्या माणसानं, तुझ्या मनात ज्या थोर व्यक्तीविषयी द्वेष पेरलाय, ती व्यक्ती जगभर पूजनीय आहे, हे कळल्यावर मनामेंदूला बसणार्या हादर्याची आत्तापासून तयारी कर... जाशील त्या देशात तुला महात्मा गांधींच्या देशातली मुलगी म्हणून ओळखले जाईल... जाशील त्या गांवात तुला बापूजींचा पुतळा दिसेल !
ऑस्ट्रेलियात ब्रिस्वेनमध्ये तुला गांधी भेटेल... ताजीकिस्तानमधल्या ड्युशान्बेमध्येही तुला महात्म्याच्या पुतळ्याचे दर्शन होईल... स्पेनच्या बर्गोस शहरात, चायनाच्या बिजिंगमध्ये, माॅरीशस, सुरीनाम, पोलंड, कोरीया जाशील तिथे गांधी,गांधी आणि गांधीच असेल.... इंग्लंडमध्ये लंडन,वेस्टमिन्स्टर अशा अनेक शहरात तुला गांधीपुतळा दिसेल... अमेरीकेत तर भारताखालोखाल विक्रमी संख्येनं तुला आपल्या महात्म्याची मूर्ती दिसेल ! गांधीविचारापुढं नतमस्तक होणारं हे सगळं जग वेडं आहे, की या सुर्यावर थुंकण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा माणूस माथेफिरू आहे, याचा तू गांभीर्यानं विचार करू लागशील...
...हा विचार करेस्तोवर अचानक तुला दुसरा हादरा बसेल. अमेरीकेत कोलंबिया विश्वविद्यालयात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक दिसेल.. लंडनला सर्वांगसुंदर डाॅ. भिमराव रामजी आंबेडकर मेमोरीयल दिसेल ! हंगेरीला डाॅ. आंबेडकर हायस्कूल, इंग्लंडमध्ये वॉल्वरहॅम्प्टन बुद्ध विहार पाहून डोळे दिपतील... कॅनडाची सायमन फ्रेझर युनिव्हर्सिटी आणि जपानची कोयासन युनिव्हर्सिटी यांनी डाॅ. आंबेडकरांच्या कार्याची, साहित्याची, शोधनिबंधांची माहिती देणारे विशेष विभाग स्थापलेत ते ही पहाशील... लंडन स्कूल ऑफ इकाॅनाॅमिक्समध्येही डाॅ. आंबेडकरांचा पुतळा दिसेल.
या सगळ्या ठिकाणी जगभरातले विद्यार्थी डाॅ. आंबेडकरांनी लिहीलेल्या पुस्तकांचा अभ्यास करताना दिसतील ! काहीजण 'Annihilation of Caste' वाचत असतील, तर काहीजण 'The Untouchables: Who were they and why they Became Untouchables' ची पारायणं करत असतील ! तू आंबेडकरांच्या इंडियामधली आहेस हे कळल्यावर त्या विद्यार्थ्यांना खूप आनंद होईल. ते तुला भारतातल्या हजारो वर्षांच्या अस्पृश्यतेबद्दल अनेक प्रश्न विचारतील. हजारो वर्ष ज्यांना शिक्षणापासून आणि सर्व गोष्टींपासून वंचित ठेवलं गेलं होतं... गुलामगिरीत पिचवलं होतं, ते शोषित-पिडीत आता या इनमिन पाऊणशे वर्षांत कुठपर्यन्त पोहोचलेत अशीही चौकशी करतील... त्यांना हे सांगू नकोस की 'मी यश मिळवल्यावर, माझ्या घरातल्या जवळच्या व्यक्तीनं त्या बांधवांना सवलतींवरून टोमणे मारले आहेत...' अजिबात सांगू नकोस हे... कारण जगभर वाईट मेसेज जाईल की या लोकांच्या मनात आजही अस्पृश्यतेचं विष आहे. आपल्या घरात अजून कितीही कचरा असला तरी बाहेरच्यांना तो दिसता कामा नये. त्यामुळं तू त्यांना खोटं हसत बळंबळंच सांग 'सगळं ठीक आहे आमच्याकडे आता.'
...नंतर मात्र तुझ्या धडावर असलेलं तुझं डोकं वापरून या सगळ्यावर विचार कर. वाचन कर. पुन्हा विचार कर. तुला आसपास फक्त 'माणूस' दिसेपर्यन्त विचार करत रहा ! तू भाग्यवान आहेस की तू अशा क्षेत्रात करीयर करतीयेस जिथं एकाचवेळी अनेक जात,धर्म,वंश,रंग,प्रांत,देशांची अनेक माणसं रोज एकत्र प्रवास करतात !! तुला रोज जाणवेल की या जगात जर कुठला धर्म असेल तर तो आहे 'मानवता'. बाकी सब झूठ. मग तू हेच विचार तुझ्या पुढच्या पिढ्यांमध्ये मुरव. तुझ्या आधीच्या पिढीतल्या अविवेकी माणसांनी पसरवलेल्या द्वेषाच्या कॅन्सरवर मात करायची हीच थेरपी आहे पोरी...
तुझं अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा ! ❤️
- किरण माने.
सुषमा अंधारे यांची घणाघाती टीका
शरद राव (पोंक्षे )नमस्कार
एरवी मला दादा भाऊ असं बोलून सुरुवात करायची सवय आहे . मात्र निश्चितपणे तुम्हाला ते आवडणार नाही. कारण तुमची माझी ना जात एक आहे.. ना गोत्र एक आहे.
कारण माणसा माणसात भेद निर्माण करणारा जो सनातनी धर्म तुम्ही सांगत आहात तो कदाचित मला मान्य होणार नाही आणि प्रबोधनकारांनी किंवा शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब यांनी किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब सांगत असलेले सर्व समावेशक हिंदुत्व तुम्हाला कळणार नाही.
तुमच्या लेकीचं मनःपूर्वक अभिनंदन. लेक कुणाचीही असो तिचं कौतुक झालंच पाहिजे. पण शरदराव कौतुक करताना सुध्दा माणूस म्हणून कसे आपण क्षुद्र किंवा नालायक आहोत हे दाखवायलाच हवे का ? शरदराव, "भेकड आणि भित्र्या माणसाची अहिंसा ही अहिंसा मानली जात नाही. हे माहीत असेलच तुम्हाला. ़
उलट ज्याच्यामध्ये कमालीचं बाहुबल आहे, भल्या भल्यांना सहज धूळ चारण्याची धमक आहे पण तरीही जो आपल्या बलाचा प्रयोग निष्कारण करत नाही तो खऱ्या अर्थाने अहिंसा मानणारा." हे इथे लिहिण्याचे कारण म्हणजे आज माझ्या राजकीय कारकीर्दीला अर्थात मी शिवसेनेत प्रवेश केला या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. ना कुठलं जातीय किंवा आर्थिक पाठबळ आहे. पण कुठल्याही जातीय आर्थिक आरक्षणाशिवाय माझ्या गुणवत्तेने मी काय करू शकते हे एक वर्षात तुमच्यासह महाराष्ट्राने बघितलंच आहे.
अर्थात् कुठलेही जातीय आर्थिक किँवा वांशिक निकष न लावता निव्वळ माझ्यातल्या गुणवत्तेची पारख करत मला राज्यभर काम करण्याची संधी देणारे सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा मानवतावादी दृष्टिकोनही तितकाच महत्त्वाचा आहे. पण हे तुमच्यासारख्या माणूसद्वेषष्ट्यांना अजिबात कळणार नाही. आणि हो ज्या आरक्षणाबद्दल तुम्ही प्रचंड तिरस्कृतपणाने लिहलत ना, त्या आरक्षणाची लाभार्थी होणे मला सहज शक्य असताना सुद्धा माझं संपूर्ण शिक्षण मी खुल्या प्रवर्गातून पूर्ण केले आहे. आणि हो नुसतं पूर्ण केलं नाही तर विशेष प्राविण्यासह आणि विद्यापीठ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील तब्बल पाच सुवर्णपदकांसह पूर्ण केले आहे. त्यामुळे आरक्षण लाभार्थी होणे शक्य असतानाही ते नाकारण्याची हिंमत जर मी करू शकत असेल तर तुमच्यासारख्या माणसाला (?) आरसा दाखवण्याची हिंमत मी करूच शकते. नाही म्हणजे माझं कौतुक तुमच्या पेक्षा दुप्पट नाही का ?
अहो शरदराव कुणी कोणत्या जातीत जन्माला यावे यासाठी कुठेही अर्ज केलेला नसतो हे माहीत असेलच तुम्हाला त्यामुळे जी गोष्ट मिळवण्यामध्ये आपले कसलेही स्वकर्तृत्व नाही त्याची जशी लाज असू नये तसा माजही असू नये याचं भान असेलच तुम्हाला.
शरद राव तुम्ही एका दुर्धर आजारातून बरे झालात. पण या आजारा दरम्यान उपचार घेत असताना रक्त लघवी तपासण्याचे ठिकाण असेल, मेडिकल स्टोअरवर काम करणारी मुलं असतील, शस्त्रक्रिया दरम्यान आवश्यकता असणारे भुलतज्ञ , केमोथेरपी देणारे डॉक्टर्स, रक्ताची गरजच पडली असेल तर रक्तपेढीत काम करणारे कर्मचारी किंवा दिवस रात्र सेवा करणाऱ्या नर्सेस यांच्या जाती तुम्हाला माहीत होत्या का हो... असो बोलण्यासारखे बरेच आहे.. पण तूर्तास एवढेच.. ! लवकर बरे व्हा..!!
ता. क. जातविषयक पित्त वारंवार उफाळून येत असेल तर बुद्ध गुरुनानक महावीर कबीर संत ज्ञानेश्वर तुकोबाराय यांच्या विचारांचा काढा नियमित घेत चला खात्रीने पित्त असे उफाळून येणार नाही.
_प्रा. सुषमा अंधारे