हॉरर चित्रपट पाहताना चित्रपटगृहातच एकाचा मृत्यू
२६ जून रोजी `अॅनाबेला कम्स होम` चित्रपट प्रदर्शित झाला.
बॅंकॉक : गेल्या महिन्यात २६ जून रोजी 'अॅनाबेला कम्स होम' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला जगभरातून प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. परंतु या दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 'अॅनाबेला कम्स होम' हॉरर चित्रपट पाहिल्यानंतर चित्रपटगृहात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, थायलंडमध्ये 'अॅनाबेला कम्स होम' पाहताना ७७ वर्षीय ब्रिटिश नागरिक बर्नार्ड चॅनिंग यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बर्नार्ड सुट्ट्यांमध्ये थायलंडला आले होते. त्यावेळी ते चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेले. मात्र चित्रपट संपल्यानंतर चित्रपटगृहातील लाइट्स सुरु करण्यात आल्या आणि बाजूला बसलेल्या एका महिलेच्या बर्नार्ड यांचा मृत्यू झाल्याचं लक्षात आलं.
त्यांच्या मृत्यूनंतर आपातकालीन सेवा, रुग्णवाहिका बोलावण्यात आली. स्थानिक पोलिसांनाही याबाबत माहिती देण्यात आली. बर्नार्ड यांचा मृत्यू चित्रपट पाहत असताना कधी झाला याबाबत कोणालाही माहिती नाही. परंतु बर्नार्ड यांचा मृत्यू 'अॅनाबेला कम्स होम' पाहतानाच झाला, याबाबत अद्याप कोणताही निश्चित खुलासा करण्यात आलेला नाही.
याआधीही २०१६ मध्ये आंध्रप्रदेशमध्ये 'द कॉन्जुरिंग २' पाहताना एका ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती.