Video : रवी पटवर्धन यांना श्रद्धांजली वाहताना निवेदिता सराफ भावूक
आसावरी आणि बाबांचं नातं प्रेक्षकांना पाहता येणार नाही...
मुंबई : कोरोना काळात एकिकडे सर्वत्र या विषाणूशी लढा देत असतानाच 2020 या वर्षात अनेक कलाकार या जगाचा निरोप घेऊन गेले. त्यामध्येच ज्येष्ठ अभिनेते ravi patwardhan रवी पटवर्धन यांनीही नुकताच सर्वांचा निरोप झाला. रवी काकारांच्या निधनाच्या वृत्तानं अवघं कलाविश्व हळहळलं. अखेरच्या श्वासापर्यंत कलेवर प्रेम करणाऱ्या याच कलासक्त अभिनेत्याच्या जाण्याचं दु:ख अभिनेत्री निवेदिता सराफ Nivedita Saraf यांनी व्यक्त केलं.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत रवी पटवर्धन यांना त्यांनी श्रद्धांजली वाहत असताना त्यांना भावना अनावर झाल्या. जड झालेला त्यांचा आवजच हे सांगून जात होता. 'अग्गं बाई सासूबाई' या मालिकेच्या निमित्तानं धीरगंभीर आवाजाच्या रवी पटवर्धन यांना पुन्हा एकदा भेटण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली. याच मालिकेत निवेदिता सराफ यांनीगी पुन्हा एकदा त्यांच्यासोबतच काम करण्याची संधी मिळवली. नकळतच मालिकेच्या निमित्तानं या दोन्ही कलाकारांमध्ये एक सुरेख नातंही आकारास आलं. हे नातं होतं वडील मुलीचं, गुरुशिष्याचं.
रवी काका आपल्यात नसले तरीही त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि कामावर असणारी निष्ठा या गोष्टी मात्र कायमच आपल्यात असतील. किंबहुना आपणही त्यांच्याचप्रमाणं कामावर अमाप प्रेम करत, एकनिष्ठ राहण्याचा आणि कोणतंही आव्हान पेलत खचून न जाता नव्या जोमानं उभं ठाकण्याची त्यांची वृत्ती आत्मसात करु, हीच त्यांच्यासाठी माझ्याकडून देण्यात आलेली श्रद्धांजली असेल असं निवेदिता सराफ म्हणाल्या.
मालिकेच्या निमित्तानं रवी पटवर्धन यांनी साकारलेली भूमिका, बबड्याला कोंबडीच्या म्हणत रागे भरणारे आजोबा, आसावरीप्रती आपुलकीची भावना जपणारे बाबा आणि शुभ्रावर प्रेम करणारे आजेसासरे यापुढं प्रेक्षकांना पाहता येणार नाहीत. असं असलं तरीही त्यांनी या भूमिकेतून साकारलेल्या आठवणी मात्र कायमच प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहतील यात शंका नाही.