नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा देशात मोदी लाट आल्याचं स्पष्ट झालं आहे. मोदींच्या भरघोस यशानंतर त्यांच्यावर देश-विदेशातूनही शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. अनेक सेलिब्रिटींनीही मोदींचं अभिनंदन केलं आहे. लोकसभा निवडणूकांच्या निकालांआधी बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमुळे अक्षय कुमार अनेक दिवस चर्चेत होता. अक्षय स्वत:ला पंतप्रधान मोदींचा सर्वात मोठा चाहता असल्याचं सांगण्याची एकही संधी सोडत नाही. लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेल्या विजयानंतर अक्षयने खास अंदाजात मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'ऐतिहासिक विजयासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी आणि देशाला जगाच्या नकाशावर आणण्यासाठी केलेल्या सर्व प्रयत्नांचा स्वीकार करण्यात आला आहे. पुढील आणखी एका यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा' असं ट्विट करत अक्षयने नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. 



अक्षयची पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्नानेही मोदींचं अभिनंदन केलं आहे. अनेकदा ट्विंकल भाजपावर टीका करताना पाहायला मिळते. परंतु यावेळी ट्विंकलने ट्विट करत मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. 



लोकसभा निवडणुकांच्या मतदानाआधी मतदान न करण्यामुळे अक्षय कुमार चर्चेत होता. अक्षय कुमारकडे कॅनडाचा पासपोर्ट आहे. त्यामुळे भारतीय नागरिकत्व नसल्याने त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं. तर अनेकांकडून अक्षयला पाठिंबाही देण्यात आला होता. मोदींची मुलाखत घेतल्यानंतरही अक्षय चर्चेत होता.