ट्रॅफिकला कंटाळून अक्षय कुमारचा मेट्रोने प्रवास
अक्षय कुमारचा नवा कारनामा...
मुंबई : बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार कायमच त्याच्या स्टंटमुळे चर्चेत असतो. तो नेमका कधी काय करेल? याचा काही नेम नाही. नुकताच त्याने एक व्हिडिओ सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यामधून त्याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे.
अक्षय कुमार सध्या आपल्या आगामी सिनेमात व्यस्त आहे. याच कामानिमित्ताने त्याला घाटकोपरहून वर्सोव्याला जायचं होतं. गुगल मॅपवर ट्रॅफिकचा अंदाज घेत त्याने चक्क मुंबई मेट्रोने प्रवास केला आहे. याचा व्हिडिओ अक्षयने स्वतः शेअर केला आहे. यामध्ये त्याच्यासोबत आगामी सिनेमाचे दिग्दर्शक राज देखील आहेत.
'गुड न्यूज' या सिनेमाच्या शुटिंगकरता अक्षय घाटकोपरमध्ये होते. बुधवारी म्हणजे १८ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा शूटिंग संपवून तो वर्सोवाला जायला निघाला. निघण्यापूर्वी त्याने मोबाईलमध्ये गुगल मॅपवरून ट्रॅफिकची स्थिती पाहिली. आणि जवळपास या प्रवासाला २ तास लागणार होते. यावेळी दिग्दर्शकाने त्याला मेट्रोने प्रवास करण्याची कल्पना सुचवली.
अक्षय कुमारने या व्हिडिओत आपला मेट्रोचा प्रवास कसा सुखकर आहे ते सांगत आहे. घाटकोपर ते वर्सोवा जेथे २ तास ५ मिनिटे लागणार होते तिथे अवघ्या २० मिनिटांत मेट्रोने प्रवास झाल्याचं म्हटलं आहे.
सध्याचा मुंबईचा प्रवास ट्रॅफिकमुळे इतका खडतर झाला आहे. याचा फटका फक्त सामान्यांनाच नाही तर कलाकारांना देखील होत आहे. शुटिंगमध्ये बराच वेळ घालवून ट्रॅफिकमध्ये प्रवास करणं हे खरंच त्रासाचं काम आहे. यामुळे आता कलाकार देखील मेट्रोकडे वळत असल्याचं दिसत आहे.