मुंबई : एखादा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याचा टीझर, ट्रेलर आणि अर्थातच गाण्यांच्या माध्यमातून त्याच्या लोकप्रियतेचा आणि प्रेक्षकांची चित्रपटाला कितपत पसंती मिळेल याचा अंदाज लावता येतो. सध्या अशाच एका चित्रपटाची चर्चा प्रेक्षकांच्या आणि बॉलिवूडच्या वर्तुळात रंगत आहे. अर्थात त्या चित्रपटाच्या निर्मिती दिग्दर्शनासोबत तगड्या स्टारकास्टलाही याचं श्रेय जातं. पण, या चर्चांमागे आणखी एक कारणही आहे. ते कारण म्हणजे चित्रपटातील गाणी. अरिजित सिंग, श्रेया घोषाल अशा गायकांचे आवाज, प्रितमचं संगीत अशी घडी बसलेली ही गाणी आहेत करण जोहरच्या 'कलंक' या आगामी चित्रपटाची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच या चित्रपटाचं शीर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं. अमिताभ भट्टाचार्य लिखित आणि प्रितमने संगीतबद्ध केलेलं हे गाणं अरिजित सिंगने गायलं आहे. आलिया भट्ट, वरुण धवन, आदित्य रॉय कपूर, सोनाक्षी सिन्हा, माधुरी दीक्षित, संजय दत्त अशा कलाकारांची झलक गाण्यात पाहायला मिळते. गाण्याच्या बहुतांश भागात आलिया आणि वरुणची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकते. 




पडद्यावर या जोड्यांची केमिस्ट्री आणि त्याला सोबत असणारा अरिजितचा मनाचा ठाव घेणारा सुरेख आवाज हे समीकरण खऱ्या अर्थाने 'कलंक'च्या यशात महत्त्वाची भूमिका निभावणारं ठरणार आहे, असं म्हणायला हरकत नाही. अवघ्या चोवीस तासांमध्ये या गाण्याला विक्रमी व्ह्यूज मिळाले असून, खुद्द करण जोहरनेही याविषयीचा आनंद ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. 'कलंक नही..... इश्क है काजल पियाँ....' असे बोल असणाऱ्या या गाण्यात विरह, प्रेम, आदर असे भाव टीपण्यात आले असून, गाण्याच्या प्रत्येक ओळीतून ते झळकत आहेत. त्यामुळे खरंच 'कलंक'च्या निमित्ताने प्रेमाची परिभाषा ही बदलत आहे, असं म्हणायला हरकत नाही.