मुंबई : अभिनेत्री आलिया भट्टची लोकप्रियता दिवसागणिक वाढताना दिसत आहे. प्रत्येक चित्रपटांमध्ये वेगळ्या थाटणीच्या भूमिकेत झळकणारी आलिया पुन्हा एकादा नवी आणि तितकीच वेगळी व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहे. दिग्दर्शक संजय लिला भंसाळीयांच्या ‘गंगुबाई काठीयावाडी’चित्रपटात झळकणार आहे. कामाठीपुऱ्यामधील विशेष चर्चिल्या गेलेल्या गंगुबाई यांच्या जीवनावर चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आलिया भट्ट चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. चित्रपटातील फर्स्ट लूक समोर आला आहे. हा चित्रपट ११ सप्टेंबर २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटामध्ये आलियाची ओळख  ‘द मॅडम ऑफ कामाठीपुरा' अशी करून देण्यात आली आहे. अगदी लहान वयात वेश्याव्यवसायात ढकलण्यात आलेल्या गंगुबाईंच्या आयुष्या भोवती चित्रपटाची कथा फिरत आहे. 



आयुष्यात अनेक चढ-उतार असूनही इतर महिलांना मदत करण्यासाठी पुढे असलेल्या गंगुबाईंची अनेक कुख्यात गुंडांसोबत ओळख झाली होती. त्याच्या आयुष्याचे वास्तव चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांना अनुभवता येणार आहे. 



भिंतीला टेकून बसलेल्या आलियाच्या डोळ्यांमध्ये नैराश्य सोबतच राग देखील दिसत आहे. शिवाय तिच्या बाजूला एक बंदूक देखील ठेवली आहे. तर या चित्रपटासाठी ती  पुरेपूर मेहनत घेत असल्याचं दिसून येत आहे. चित्रपटाची कथा लेखक हुसैन जैदी लिखीत 'माफिया क्वींस ऑफ़ मुंबई' पुस्तकातील एका पाठावर आधारित असणार आहे.  


सध्या आलिया तिच्या वडिलांच्या 'सडक २' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. त्याचप्रमाणे ती करण जोहरच्या 'तख्त' तर अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात झळकणार आहे. 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात ती बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे.